कोरोना नियमांचे पालन करुन मंदिर दर्शनासाठी खुले ; कुस्ती प्रेमींची मात्र निराशा
नंदुरबार – रविंद्र गवळे
वडाळी (ता.शहादा) येथील नवसाला पावणाऱ्या गुरु गोरक्षनाथांच्या यात्रोत्सवाला दि. 1 मार्च रोजी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सुरुवात होत आहे. दरवर्षी दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेला कोरोना नियमांचे पालन करुन परवानगी देण्यात आली आहे. यामुळे भाविकांसाठी कोरोना नियमांचे पालन करुन मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक हजेरी लावत असून, यात्रेच्या काळात नवस फेडण्यासाठी देखील भाविकांची गर्दी होत असते. याठिकाणी गोरक्षनाथांचे पुरातन मंदिर असून या मंदिराची आख्यायिका देखील तशी मोठी आहे.सदरील गोरक्षनाथांची मुर्ती ही स्वयंभू असून दभाशी ता.शिंदखेडा येथील गुलाबगिरी गोसावी यांना ती जवळच असलेल्या रंगुमती नदीच्या पात्रात सापडली असल्याचे तसेच नदीकाठावरील सात मारुती मंदिरांपैकी एक मारुती मंदिर व परिसरातील एकमेव शनी मंदिर याच ठिकाणी असल्याने तेथेच छोटेसे मंदिर उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांना मूलबाळ नसल्याने आप्पापुरी गोसावी यांना दत्तक घेतले. त्यांच्यानंतर आजतागायत या मंदिराची अविरत सेवा तेच करत असून त्यानंतर त्यांच्या परिवाराकडे ही जबाबदारी आहे.काही ज्येष्ठांच्या म्हणण्यानुसार या यात्रेत सन 1965 ते 1970 च्या काळात लाकडांची मोठी बाजारपेठ भरत होती.त्यामुळे ही यात्रा 15 – 15 दिवस चालत असल्याचे बोलले जाते.या मंदिरात भाविकांची वाढती संख्या पाहता सन 2016 साली लोकवर्गणीतून या मंदिराचा जीर्णोद्धार व भव्य असा सभामंडप बांधण्यात आला.यात्राकाळात मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात येते यात्रेनिमित्त मध्य प्रदेश, गुजरातसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात आपला नवस फेडण्यासाठी याठिकाणी येतात. दोन दिवस चालणार्या या यात्रेत विविध व्यवसाय थाटले जातात.या यात्रेला मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थिती लावत.असल्यामुळे कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याच ग्राम पंचायत प्रशासनाने ठरवले असून, स्वयंसेवक नेमण्यात येणार आहेत. त्याच सोबत प्रा.आ.केंद्राच्यावतीने आरोग्याच्या सेवा पुरविलेल्या जाणार आहेत. तर सारंगखेडा पोलीस ठाण्याच्यावतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
चौकट –
यंदा यात्रेच प्रमुख आकर्षण कुस्ती नाही
तत्कालीन पोलीस पाटील चंद्रभानगिर गोसावी यांना कुस्तीची आवड असल्याने त्यांनी कुस्ती या खेळाला या ठिकाणी मोठी संधी देत कुस्तीच्या दंगली सुरू केल्या याच यात्रेत महाराष्ट्रातील नामवंत मल्लांना सहभाग कुस्तीला सर्वदूर पसरवली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली मात्र कालांतराने कुस्तीचा दंगल बंद झाल्या होत्या मात्र युवकांनी एकत्रित येत गावकऱ्यांच्या सहभागाने गेल्या दोन वर्षांपूर्वी कुस्तीच्या दंगली पुन्हा सुरु केल्या होत्या मात्र मागील वर्षांपासून कोरोनाच सावट असल्याने कुस्तीला परवानगी देण्यात आलेली नाही. दरवर्षीच्या पुन्हा कुस्तीच्या दंगली सुरु व्हाव्यात अशी अपेक्षा परिसरातील कुस्तीप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.