वडाळीत लाखोंची जबरी चोरी ; पोलिसांपुढे आव्हान
DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- रविंद्र गवळे
नंदुरबार :- नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडाळी येथील कुटुंब कामानिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधून 4 ते 5 अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत सुमारे 3 लाख 64 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याआधी शेजारील आशापुरी ज्वेलर्स फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, सकाळी शेजारील लोकांनी दरवाजा उघडा बघितल्याने लक्षात आले. ग्रामीण भागात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनेमुळे पोलिसांपुढे आव्हान निर्माण केले आहे. शहादा तालुक्यातील वडाळी येथील केंद्रप्रमुख मोहन मांगतू बिस्नारीया यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सुमारे 3 लाख 64 हजार रुपयांच्या ऐवज चोरून नेल्याची घटना 11 जानेवारीच्या मध्यरात्री घडली आहे. बिस्नारीया कुटुंब लहान मुलाच्या विवाह झाल्याच्यानंतर काही कामानिमित्त धुळे येथे गेले असल्याची संधी चोरट्यांनी साधून हा डल्ला मारल्याचे बोलले जात आहे. रात्रीच्या सुमारास 4 ते 5 अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाटातील 53 ग्रॅम, सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला आहे. यात 10 हजाराची 8 ग्रॅम सोन्याची चैन, 12 हजाराचे 6 ग्रॅम कानातले, 10 हजाराचे 5 ग्रॅम मनीमंगळसूत्र, 10 ग्रॅम सोन्याचे मनी असा मुद्देमालावर चोरट्यांनी हात साफ केला आहे. घटनास्थळी श्वानपथक व फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. बोटांचे नमुने घेत श्वानपथकाने जी.एस.विद्यामंदिर व स्वामी समर्थ केंद्रापर्यंत माग काढला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक किरण बार्हे, फॉरेन्सिक टीमचे संजय रामोळे, विनोद भिल, देविदास नाईक, तोरण नाईक, गोविंद जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करुन पंचनामा केला. वडाळी परिसरात चोरीच्या घटना वेळोवेळी घडत आहेत. नूतन पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांना नवीन वर्षाच्या सुरुवातीला चोरांनी सलामी दिल्याची चर्चा सध्या परिसरात रंगली आहे. पोलिसांपुढे चोरट्यांना शोधण्याचे आवाहन उभे राहिले असून, या चोरीचा छडा लावण्यात येईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांनी दिले आहे.