नंदुरबार – ( रविंद्र गवळे)
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी शासनाला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयांची माहिती जनतेला देण्यासाठी दोन वर्ष जनसेवेची, ‘महाविकास’ आघाडीची’या घोषवाक्यासह जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिनस्थ जिल्हा माहिती कार्यालयामार्फत नंदुरबार जिल्ह्यात आजपासून जनजागृती मोहिमेस सुरवात झाली.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात लोककला पथकातर्फे जनजागृती मोहिमेची सुरुवात आज नंदुरबार, तळोदा व नवापूर तालुक्यातून करण्यात आली. नंदुरबार येथे बसस्थानक परिसर तसेच नवापूर तालुक्यातील खांडबारा, तळोदा तालुक्यातील अमोनी येथे पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते. आज पासुन सुरु झालेल्या या जनजागृती मोहिम नंदुरबार जिल्ह्यातील सहाही तालुक्यात राबविली जाणार असून पहिल्या टप्प्यात 15 मार्चपर्यंत 63 गावांमध्ये कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाणार आहे. प्रत्येक कलापथक 21 कार्यक्रमांचे सादरीकरण करणार असून त्यात जिल्हा मुख्यालयाचे गर्दीचे ठिकाण, तालुका मुख्यालयाचे गर्दीचे ठिकाण, कृषी उत्पन्न बाजार समित्या, गाव जत्रा, आठवडे बाजार, उपजिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे, रेल्वे स्थानकांच्या बाहेरचा परिसर, आठवडे बाजार आदि याठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत.
या लोककला पथकांच्या माध्यमातून शासनाच्या शिवभोजन योजना, कोरोनामुळे बाधित रुग्णांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत केलेले उपचार, आरोग्य यंत्रणांचे बळकटीकरण, शेतकऱ्यांसाठी विकेल ते पिकेल अभियान, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, इमारत बांधकाम कामगारांना, घरेलू कामगारांना, रिक्षा चालकांना केलेली मदत तसेच कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना पाच लाख रुपयांचा मदत, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कोरोनामुळे मयत झालेल्या नागरिकांच्या नातलगांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेला गती. मोफत अन्नधान्य वितरण आदी योजनांची माहिती देण्यात येत आहे.