भुवनेश दुसाने.(पाचोरा)
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथून जवळच असलेल्या कोल्हे गावाजवळच उतावळी नदीवर धरण आहे. या धरणात पाहीजे त्या प्रमाणात जलसाठा असल्याने या धरणाच्या जवळच असलेल्या कोल्हे, डांभुर्णी व मोराड गाव शिवारातील विहिरींना रब्बी हंगाम घेता येईल इतकी पाण्याची आवक आहे. म्हणून कोल्हे, डांभुर्णी व मोराड येथील शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून अत्यंत बिकट परिस्थितीत गहू, हरभरा, मका, सुर्यफुल, दादर, टरबुज या पीकांची आपल्या शेतात लागवड करुन जास्तीत जास्त उत्पन्न काढण्यासाठी चे स्वप्न उराशी बाळगून जीवापाड मेहनत करत आहेत. म्हणून या शिबिरात सगळीकडे हिरवळ दिसून येत असून पिके जोमदार आहेत.
परंतु कोल्हे धरण परिसरात असलेल्या पाच ट्रान्सफॉर्मर ज्या, ज्या शेतकऱ्यांनी अधिकृत विद्युतपुरवठा घेतलेला आहे. त्या सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना कधी रात्री, तर कधी दिवसा तोही अल्पवेळ कमी दाबाने विद्यूतपूरवठा मिळत असल्याने तसेच वारंवार विद्युतपंप जळत असल्याने शेतातील विहीरींना भरपूर पाणी असल्यावर ही पिकांना वेळेवर पाणी दिले जात नसल्याने दिवसरात्र मेहनत करून जोपासलेली पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर काही शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ येऊ शकते असे या परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
पिके सुकू नयेत म्हणून आम्हाला चांगल्याप्रकारे व पुरेसा विद्यूतपुरवठा व्हावा म्हणून कोल्हे, डांभुर्णी व पिंप्री येथील शेतकऱ्यांनी पिंपळगाव हरेश्र्वर येथील कनिष्ठ अभियंता या.श्री. सचिन जाधव साहेब यांच्याकडे वारंवार भेटून तक्रारी दाखल करुन समस्या सोडविण्यासाठी मागणी केली आहे. मात्र संबंधित अधिकारी आमच्या मागणीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात व आमच्याशी अरेरावीची भाषा करत आडदांड पणाने वागुन अपमानित करतात तसेच तुम्ही कितीही बोंबलत बसा, कुणाकडेही जा कितीही फिरा माझे तुमच्याकडून काहीच वाकडे होणार नाही अशी भाषा वापरुन आम्ही विद्युतग्राहक असल्यावर ही भिकाऱ्यासारखी वागणूक देतात अशी माहिती या त्रस्त शेतकऱ्यांनी सत्यजित न्यूजकडे कथन करतांना काही शेतकऱ्यांचा अक्षरशा कंठ दाटून आला होता. तसेच काही शेतकऱ्यांनी बि, बियाणे, खते उधारीवर घेतली असून शेतमशागत व मंजूरीसाठी कर्ज काढून शेती करत आहेत. जर हा रब्बीचा हंगाम हातचा गेला तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही असेही संतप्त शेतकऱ्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे जेव्हा, जेव्हा विद्युतवितरण कंपनीकडून थकीत बिलासाठी अडवणूक करण्यात आली तेव्हा, तेव्हा शेतकऱ्यांनी गहाण, लहान करुन बिले भारलेली असल्यावर ही जर चांगल्याप्रकारे विद्युतपुरवठा मीळत नसेल तर शेतकऱ्यांनी काय करावे असा प्रश्न विचारला जात आहे.
(खुलासा)
कनिष्ठ अभियंता या.श्री. सचिन जाधव यांच्याशी संपर्क साधला असता वाडी व पिंपळगाव हरेश्वर सबस्टेशलाच ३३ के. व्ही. वरुन होणारा विद्युतपुरवठा कमी दाबाने मिळत असल्याने आम्हाला मोठी अडचण निर्माण झाली आहे. म्हणून आम्ही शेतकऱ्यांना पुर्णपणे विद्युतपुरवठा करु शकत नाही. तरीही अशा बिकट परिस्थितीत आम्ही शेतकऱ्यांना चांगल्याप्रकारे विद्युतपुरवठा देण्यासाठी प्रयत्नशील असून लवकरच विद्युतपुरवठ्यात सुधारणा करण्यात येईल अशी माहिती कनिष्ठ अभियंता यांनी दिली आहे. तसेच शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्यासाठी गटागटाने आलटून, पालटून विद्युत पंप चालवले तर थोड्याफार प्रमाणात समस्या सुटु शकते असे सांगितले.