खरबुजाचे फायदे: पारा वाढू लागला तसे आता बाजारात उन्हाळी फळं डोकावू लागले आहेत… फळांचा राजा आंबे येऊन त्याने मार्केट व्यापून टाकण्याआधी इतर उन्हाळी फळांचा मनसोक्त आस्वाद घेऊन टाका….
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे 5 जबरदस्त फायदे, सिझनल खरबुजावर मारा मस्त ताव
ठळक मुद्दे
खरबुजाचे हे जबरदस्त फायदे वाचा आणि नियमितपणे खरबूज खा.. खरबुजामध्ये व्हिटॅमिन सी आणि ॲण्टीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात.
उन्हाळा आला की त्याच्या पाठोपाठ टरबूज- खरबूज बाजारात येतात. आंबा मार्केटमध्ये येईपर्यंत या उन्हाळी फळांचा दबदबा असतो. पण त्यानंतर मात्र कितीही नाही, म्हटलं तरी इतर फळांचा भाव कमी होतो आणि फळांचा राजा आंबा मात्र भाव खाऊन जातो. त्यामुळेच तर आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि टरबूज- खरबूज बाजारात यायलाही सुरुवात झाली आहे. त्यातही टरबूज आवडीने खाणारे खूप जणं आहेत. खरबुजाला मात्र आणखीनच भाव कमी.. म्हणूनच तर खरबुजाचे हे जबरदस्त फायदे वाचा आणि नियमितपणे खरबूज खा.. खरबुजामध्ये व्हिटॅमिन सी आणि ॲण्टीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात.
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे फायदे.
१. उन्हाळ्यात उष्णता वाढल्याने अंगाची लाही लाही होत असते. अशा वेळी शरीराला थंडावा मिळावा म्हणून खरबूज खावे. खरबूज हे शीतफळ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे खूप उष्णता झाली आहे, असे जाणवल्यास खरबूज खावे.
२. उन्हाळ्यात घाम येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे शरीर डिहायड्रेटेड होण्याचा धोका असतो. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी समतोल राखण्यासाठी खरबूज खावे. खरबुजात उत्तम पाणीसाठा असल्याने उन्हाळ्यासाठी ते चांगले फळ मानले जाते.
३. उन्हाळ्यात पाणी कमी प्यायले गेल्याने किंवा शरीर डिहायड्रेटेड झाल्याने अनेक लोकांना लघवीला त्रास होतो. त्याठिकाणी जळजळ होते. हा त्रास थांबविण्यासाठी खरबूज खाणे उपयुक्त ठरते.
४. अशक्तपणा आला असेल तर खरबूज खावे. खरबूजात कॅलरी चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे ज्या व्यक्तींना वजन वाढवायचे असेल, ज्यांना अशक्तपणा आला असेल, त्यांना खरबूज खाण्याचा सल्ला दिला जातो.
५. हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार यांनी सांगितले की ज्या लोकांना उन्हाळ्यात बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, अशा लोकांनाही खरबूज खाणे फायद्याचे ठरते.
खरबूजाच्या या रेसिपी करून पहा..
खरबूज नेहमीच काय नुसतंच चिरून खायचं, असं वाटत असेल तर खरबुजाची खीर किंवा ज्यूस अशा काही रेसिपी करून बघा.. – खरबुजाचा ज्युस हा एक नाश्त्याचा उत्तम पदार्थ होऊ शकतो. यासाठी खरबुजाची सालं आणि बिया काढून टाका. फोडी चिरून मिक्सरमधून फिरवून घ्या. हवं तर त्यात थोडं पाणी आणि साखर टाका. खरबूज ज्यूस तयार..- खरबुजाचा ज्यूस करण्यासाठी खरबूजाच्या सालीआणि बिया काढून टाका. मोठ्या फोडींचे बारीक तुकडे करा. हे तुकडे तुपात परतून घ्या. त्यात दूध आणि साखर टाकून शिजवा. यानंतर सुकामेवा टाकून खरबुजाची खीर खा.