प्रतिनिधी- रमजान मुलानी
सांगली : महाराष्ट्र दिनी सांगली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार अशा १० जणांना पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये मिरज विभागाचे पोलिस उपअधीक्षक अशोक विरकर, जत विभागाचे पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांचा समावेश आहे. राज्याच्या पोलिस महासंचालकांकडून पोलीस दलामध्ये उत्तम कामगिरी, उल्लेखनीय व प्रशंसनीय सेवा केल्याबद्दल महाराष्ट्र दिनी सन्मान पदकाने गौरविण्यात येते. यावेळी सांगली जिल्हा पोलिस दलातील तब्बल १० अधिकारी अंमलदार या पदकाचे मानकरी ठरले आहेत. त्यांना दिनांक १ में रोजी रविवारी आयोजित महाराष्ट्र दिनाच्या पोलीस परेडच्या वेळी सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पोलिस कवायत मैदानावर होणार आहे. सन्मान चिन्हाच्या मानकरयांमध्ये मिरज विभागाचे पोलीस उपाधीक्षक अशोक तानाजी विरकर, विभागाचे पोलिस उपाधीक्षक रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक राजेश नारायणराव रामाघरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे सहाय्यक फौजदार सिद्धाप्पा लक्ष्मण रुपनर, हवालदार संदीप गुरव, जिल्हा विशेष शाखेकडील हवालदार विकास संभाजी पाटणकर, मोटार वाहन विभागाकडील सहाय्यक फौजदार रावसाहेब पाटील, हवालदार अनिल लांडगे, वाहतूक शाखा, मिरजकडील हवालदार फारूक नालबंद, हवालदार श्री. स्नेहल नंदकुमार सुतार आदींचा समावेश आहे. या सर्वांचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आणि अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती मनीषा दुबुले यांनी अभिनंदन केले आहे .
पोलीस महासंचालकांच्या पदकाच्या मानकर्यांमधील पोलीस उपाधीक्षक अशोक विरकर हे पोलीस सेवेत रुजू होण्यापूर्वी महसूल खात्याच्या सेवेत होते. ते वर्धा जिल्ह्यात पंचायत समितीकडे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असतानाच पोलिस उपाधीक्षक पदाच्या परीक्षेत यशस्वी झाले. ट्रेनिंगनंतर ते प्रथम नांदेड येथे पोलिस उपाधीक्षक म्हणून रुजू झाले. त्याठिकाणी साडेतीन वर्षे सेवा दिल्यानंतर २०१८ मध्ये त्यांची बदली सांगली शहर विभागाकडे झाली. सध्या ते मिरज विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.