प्रतिनिधी मिरज:-, दि.०८ रोजी शहरातील आंबेडकर उद्यानजवळ पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणास अटक करून गावठी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. गणेश मोहन केंगार (वय २०, रा.जाखापूर, ता. कवठेमहांकाळ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून पिस्तूल, काडतूससह मोटरसायकल असा १ लाख, ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला, महात्मा गांधी चौकी पोलिसानी ही कारवाई केली. गणेश केंगार हा आंबेडकर उद्यानजवळ (एमएच सीवाय-५२६८) मोटारसायकल घेऊन संशयास्पद फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार महात्मा गांधी चौकी पोलिसांच्या पथकाने सापळा रचला होता. गणेश केंगार याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना संशय आल्यानंतर त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ ७५ हजार रुपयांचे १ गावठी बनावटीचे फॅक्टरी मेड पिस्तूल आणि ४ हजार रुपयांचे २ जिवंत काडतुसे मिळून आले. सदर पिस्तूलबाबत चौकशी केली असता त्याने समाधान कारक उत्तर दिले नाही. पोलिसांनी सदर पिस्तूल आणि काडतूस हस्तगत केले. तसेच ५५ हजारांची मोटारसायकल असा १ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली.