DPT NEWS NETWORK ✍️ आपल्यापैकी अनेकांनी त्यांचे जुने एखादे सिम कार्ड बंद करून टाकलेले असते. नवीन घेऊन ते वापरत असतो. आणि आपण ते जुने सिम विसरून पण जातो. मात्र सायबर गुन्हेगार अशा बंद पडलेल्या सिमच्या माध्यमातून तुम्हाला मोहात पाडून नंतर चक्क तुमचे बँक अकाउंट पूर्ण रिकामे करत आहेत. त्यापासून सावध करण्यासाठीच हि पोस्ट !
हि फसवणूक नेमकी कशी होते ?
तर तुम्हाला कॉल किंवा मेसेज येतो की,
“तुमचे बंद पडलेले सिमकार्ड अगदी सोप्या पद्धतीने व अतिशय स्वस्तात पुन्हा सुरु करायचे आहे का ?”
तुम्ही त्यावेळी विचार करता की स्वस्त आहे म्हणतात तर करू ऍक्टिव्हेट जुने कार्ड !
आणि मग तुम्ही जर “हो” म्हणालात तर समोरून सांगितलं जातं की,.
“कार्ड पुन्हा सुरु करण्यासाठी तुम्हाला आधी नॉमिनल दहा रुपये भरावे लागतील”
तुम्ही विचारता की, “हरकत नाही. कसे व कुठं पाठवायचे?”
त्यावेळी समोरून निरोप येतो की,
त्यासाठी आधी तुमचे ते कार्ड ज्या बँकेशी जोडले गेलेलं आहे त्या बँकेचे डिटेल्स (अकाउंट नंबर इत्यादी) द्यावेत.
तुम्ही विचार करता की नुसतं अकाउंट नंबर तर द्यायचा आहे. असं म्हणून बेसावधपणे तुम्ही ते डिटेल्स दिल्यावर,
समोरून सांगण्यात येते की, “आता तुम्हाला एक लिंक येईल त्यात आवश्यक ती माहिती भरा आणि आम्हाला पाठवा, आणि नंतर तुम्हाला सिमकार्ड रिचार्जसाठी म्हणून एक ओटीपी येईल तो आम्हाला लगेच सांगा कारण नाहीतर पाच मिनिटानंतर तो निष्क्रिय होईल अन तुमचं रिचार्ज होणार नाही.”
त्याप्रमाणे तुम्ही सर्व प्रोसिजर करता अन आलेला ओटीपी समोरच्याला देता (कारण ते रिचार्जसाठीचा ओटीपी आहे असं तुम्ही समजून जाता.) मात्र मधल्या वेळेत समोरच्याने तुमचं अकाउंट ओपन करून पैसे विड्रॉलची प्रोसेस सुरु केलेली असते आणि तुम्हाला जो ओटीपी येतो तो रिचार्जचा नसून बँकेकडून आलेला असतो.
तुम्ही एक लक्षात घेतलं का ? असा ओटीपी जेव्हा येतो तेव्हा सुरुवातीला पूर्ण मेसेज येतो अन एक दोन सेकंद नंतर तो शॉर्ट होऊन फक्त ओटीपी च समोर दिसतो. तुम्ही तो लगेच समोरच्याला घाईघाईत देऊन मोकळे होता.
त्यावर समोरून निरोप येतो की, “थँक्स, काम झाले आहे. तुमचं रिचार्ज झाल्याचा मेसेज तुम्हाला थोड्याच वेळात येईल !”
तुम्हीही रिलॅक्स होता ! मात्र पाच दहा मिनिटानंतर मेसेज काय येतो ?
तर तो तुमच्या बँकेचा असतो आणि त्यानुसार तुमच्या खात्यातून सगळे पैसे विड्रॉल झाल्याचे समजते.
तुमच्या पायाखालची जमीनच सरकते ! दहा रुपयांच्या मोहापायी पाच दहा लाख रुपये हातोहात फसवून लुटले जातात.
डीडी क्लास : आता यावर आपण नेमकं सावध कसे राहायचे ? तर फार सोपे आहे.
१) आधी हे लक्षात घ्या की, सिम प्रोव्हायडर कंपनीच्या नियमानुसार सलग तीन महिने जर एखादे सिमकार्ड बंद असेल तर तो तुमचा नंबर रद्द होतो आणि कंपनी मग तो नम्बर दुसऱ्या कुणाला तरी द्यायला मोकळी होते. त्यामुळे तुमचं सिम जर तीन महिन्यापेक्षा जास्त काळ बंद असेल तर मग अशा नंतर “दहा रुपयात रिचार्ज” च्या कॉल / मेसेज ला थाराच देऊ नका ! त्यांना अटेंड करू नका.
दुसरी एक सावध सूचना म्हणजे तुम्ही जुने सिम बंद केले आणि नवीन घेतलं असेल तर ते तुमच्या बँकेला लगेच कळवा म्हणजे मग बँकवाले तुमचा जुना सिम नम्बर रद्द करून तिथे नवीन टाकतील त्यामुळे तुमची नंतर होणारी फसवणूक थांबू शकेल !
२) मुळात अशा कुठल्या कॉल / मेसेज ला एंटरटेनच करू नका. कारण कुठलीही कंपनी असे बंद पडलेले सिमकार्ड रिचार्ज करण्यासाठी कॉल / मेसेज करत नसते. त्यासाठी तुम्हाला स्वतःला फिजिकली तुमच्या जवळच्या कंपनी सर्व्हिस सेंटर मध्ये जावे लागते.
३) नकळत / बेसावधपणे जरी समजा तुम्ही अशा कॉल / मेसेजला अटेंड केलं असेल तरी समोरचे लोक खूप घाई घाई करत असतात त्याकडे दुर्लक्ष करून शांतपणे ते काय सांगत आहेत ती प्रोसिजर आधी स्वतः नीट निरखून घ्या. अनोळखी कोणत्याही लिंकला क्लिक करू नका.
४) इतकं होऊनही बेसावधपणे तुम्ही लिंक क्लिक केलीच आणि नंतर ओटीपी आलाच तर तुमच्या एक लक्षात आहे का ? की तो ओटीपीचा मेसेज सुरुवातीला पूर्ण स्क्रीनवर दिसतो आणि एक दोन सेकंदनंतर तो शॉर्ट होऊन फक्त ओटीपी (नम्बर)च दिसतो. बाकी टेक्स्ट हाईड होते. तुम्ही जर पुन्हा त्या मेसेजला टच केलं तरच तो मेसेज पुन्हा पूर्ण ओपन होतो. तर तो मेसेज पुन्हा ओपन करून वाचा, तो वाचायला फारतर दहा सेकंद लागतात. त्याचवेळी तुमच्या लक्षात येईल की तो ओटीपी रिचार्जसाठी कंपनीकडून आलेला नसून तुमच्याच बँकेकडून आलेला आहे. त्यावेळी सावध होऊन तो ओटीपी समोरच्याला देऊ नका ! तिथेच तुमची फसवणूक थांबते.
५) मी सांगितलेलं इतकं सगळं लक्षात ठेवूनही तरी जर समजा फसलात तर अगदी ताबडतोब जवळच्या सायबर सेल कडे जाऊन तक्रार दाखल करा. तसेच १९३० या नम्बरवर कॉल करून तक्रार दाखल करा !
जसे अपघात झाल्यावर जितक्या कमीत कमी वेळेत तुम्ही त्याला दवाखान्यात नेता तितक्या प्रमाणात तो वाचण्याची शक्यता वाढते अगदी तसेच फसवणुकीचा हा अपघात समजावा अन लवकरात लवकर सायबर सेलकडे जावे, हे सर्वात बेस्ट !
काळजी घ्या ! सावध राहा. इतरांनाही सावध करा
थोड्या मोहापायी मोठे नुकसान करून घेऊ नका असे आवाहन सायबर अॅवरनेस फौंडेशनचे अध्यक्ष व ख्यातनाम सायबर तज्ञ अॅड. चैतन्य एम. भंडारी ,धनंजय देशपांडे,पुणे यांनी तमाम नागरीकांना व जनतेला केले आहे.