DPT NEWS NETWORK 🗞️✍️ 📰
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा करत असताना “सबका साथ सबका विकास” हा मूलमंत्र जपत मोदी सरकारने यशस्वीरीत्या ९ वर्ष पूर्ण केली आहेत. सक्षम अर्थव्यवस्था, मजबूत परराष्ट्रधोरण, आत्मनिर्भर भारत व संरक्षणसज्जता साध्य केली आहे.
सर्वसमावेशक विकासाचे धोरण हीच कोणत्याही राष्ट्राच्या सामाजिक आर्थिक व राजकीय प्रगतीची गुरुकिल्ली आहे हा महात्मा गांधींच्या विचाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सरकारने कायमच योजनांची आखणी केली आहे. महात्मा गांधींनी स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात व सुराज्याचे परिवर्तन रामराज्यात करण्यासाठी राज्यकर्त्यांना एक मंत्र दिला होता. “सर्वात गरीब आणि दुर्बल व्यक्तीचा चेहरा आठवा आणि स्वतःला विचारा की तुम्ही विचार करत असलेला निर्णय त्याच्या फायद्याचा असेल का? हा निर्णय त्याला स्वतःच्या जीवनावर आणि नशिबावर नियंत्रण मिळवून देईल का? हा मंत्र केंद्रस्थानी ठेवून जनधन योजना, किसान सन्मान निधी योजना, पंतप्रधान गरीब कल्याण योजना, उज्ज्वला योजना, यासारख्या अनेक योजनांची आखणी केली आहे. यशस्वी योजनांच्या मांदीयाळीत आणखी एक सर्वसामावेशक व समाजात आमूलाग्र बदल घडविण्याची ताकत असलेली पंतप्रधान विश्वकर्मा योजना येणाऱ्या १७ सप्टेंबरला सुरु होत आहे.
स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेत अलुतेदार व बलुतेदारांचे महत्व हे भारतीय समाजाला मान्य आहे. स्वयंपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था निर्मितीमध्ये या बांधवानी मोलाची भूमिका बजावली आहे परंतु जागतिकी करणाच्या रेटयात ही ग्रामीण अर्थव्यवस्था विस्कळीत झाली. काही ठिकाणी लयाला गेली. आपला परंपरागत व्यवसाय सोडून अनेक कुटुंबांनी शहराची वाट धरली. तेथेही त्यांच्या परंपरागत ज्ञानाला व कौशल्याला न्याय मिळाला नाही. तुटपुंज्या साधनसामग्रीवर काम करणारा व समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर लोटलेल्या विश्वकर्मानां नव्याने उभारी देण्यासाठी त्यांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना एक नवीन ओळख देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी व जागतिक बाजारपेठेंशी त्यांना जोडण्यासाठी लागणारी आर्थिक मदत, यंत्रे, प्रशिक्षण व सहकार्य करण्यासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची आखणी करण्यात आली आहे. योजनेची आखणी यशस्वी करण्याची जबाबदारी आदरणीय श्री नारायण राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल करणाऱ्या सूक्ष्म, लघु आणि माध्यम उद्योग मंत्रालयाकडे देण्यात आलेली आहे.
योजनेची वैशिष्ट्ये :
१७सप्टेंबर २०२३ रोजी पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची सुरुवात होत आहे १५ हजार कोटी रुपयांच्या या योजनांच्या अंमलबजावणीचा कालावधी हा ५ वर्षासाठी आहे. या पाच वर्षात ३० लाख विश्वकर्मांना योजनेचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे. यात सुतार, लोहार, माळी, सोनार, कुंभार, चांभार, मिस्त्री, न्हावी, धोबी, शिंपी, मासेमारीसाठी लागणारी जाळी बनवणारे, नाव/बोट निर्माते, कुलूप निर्माते, पाथरवट व मूर्तिकार, झाडू बनवणारे, खेळणी तयार करणारे, हत्यारांची निर्मिती करणारे व लोहारांच्या अवजारांची निर्मिती करणारे यांना ही योजना लागू असेल. इतर कोणत्याही व्यवसायाचा जर या यादीत समावेश करायचा असेल तर एमएसएमई कॅबिनेट मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेली समिती याचा निर्णय घेईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विश्वकर्मा वेब पोर्टल वर आधार कार्डाच्या सहाय्याने नोंदणी करावी लागेल. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यात प्रमाणपत्र ओळखपत्र मिळेल ज्यामुळे त्यांना विश्वकर्मा म्हणून मान्यता मिळेल. त्याचप्रमाणे पहिल्या टप्प्यात ५% दराने १ लाख रुपयांचे बिनातारण कर्ज मिळेल व त्याची परतफेड केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात २ लाख बिनातारण कर्ज मिळेल या लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात ५ दिवसाचे प्रशिक्षण व दुसऱ्या टप्प्यात १५ दिवसांचे आधुनिक तंत्रज्ञान व मार्केटिंगचे प्रशिक्षण दिले जाईल जेणेकरून सध्या असलेल्या आधुनिक तंत्रज्ञान व बाजारपेठेची ओळख त्यांना होईल. या प्रशिक्षणासोबतच १५ हजार रुपयांची टूल किट (कामासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या अवजारांचा संच) दिले जातील. विश्वाकर्मांनी तयार केलेल्या मालाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून गुणवत्ता प्रमाणपत्र व ब्रँडिंग साठी राष्ट्रीय विपनन समिती स्थापन केली आहे जी ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून वेगवेगळे योजनांच्या मदतीने व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करेल.
योजनेचे महत्व :
भारताच्या गौरवशाली इतिहासात विश्वकर्मा समुदायाचे योगदान अमूल्य आहे विशेषतः वास्तूकला, अभियांत्रिकी, स्थापत्य, कलाकुसर या क्षेत्रात एक नवी उंची गाठली गेली होती. याच समुदायाने पारंपारिक ज्ञानाचे जतन करून आपला वारसा व संस्कृती जपली होती. आज या समुदायाला मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणून परत एकदा गौरवशाली भारताच्या निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा उचलण्यासाठी आर्थिक, सामाजिक, आधुनिक टेक्नॉलॉजी, मध्ये बळकट करणे आवश्यक आहे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या ५ वर्षात ३० लाख विश्वकर्मा बांधवांना एक नवीन ओळख, त्यांना आधुनिक ट्रेनिंग व आर्थिक पाठबळ देऊन जागतिक बाजारपेठेवर आपला ठसा उमटविण्यासाठी तयार करायचे आहे. श्री नरेंद्र मोदीजी व श्री नारायण राणे साहेब यांच्या कामाचा झपाटा पाहता हे लवकर सिद्ध होणार यात शंका नाही.
लेख संरचना / संकल्पना / द्वारे :
श्री सचिन भदाणे (२०१३ बॅच), सध्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, सन्माननीय कॅबिनेट मंत्री श्री नारायण राणे साहेब यांचे अतिरिक्त सचिव पदी कार्यरत आहेत.