DPT NEWS NETWORK 🗞️✍️
मुंबई – राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांची राज्याचे पोलीस महासंचालपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर, आता त्यांच्याकडे ही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदावर किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची सेवानिवृतती झाल्यानंतर हे पद गेल्या काही महिन्यांपासून रिकामेच होते. अखेर, राज्य सरकारने एमपीएससीच्या अध्यक्षपदी नवीन नियुक्ती केली आहे. नवीन अध्यक्षांच्या नियुक्तीचा चेंडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात असून लवकरच रजनीश सेठ यांची या पदावर नियुक्ती होऊ शकते, अशी चर्चा होती.
एमपीएससीचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर हे बुधवारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली होती. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. तेव्हा रजनीश सेठ यांनीही अर्ज केला होता. मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आलेल्या अर्जांची छाननी करून तीन नावांची यादी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठविली. या तिघांमध्ये रजनीश सेठ, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि वन सेवेतील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी प्रदीपकुमार यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. यात सेठ यांचे नाव आघाडीवर होतं.
दरम्यान यापूर्वीचे एमपीएससीचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर सेवानिवृत्त झाले आहेत. ते नोव्हेंबर २०२१ मध्ये या पदावर रुजू झाले होते. त्यावेळी, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तशी अधिसूचना काढली होती. एमपीएसी आयोगाला पूर्णवेळ अध्यक्ष नव्हता. आयोगावर पूर्णवेळ अध्यक्ष देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यानंतर राज्य सरकारने किशोर राजे निंबाळकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यानुसार, त्यांचा कार्यकाळ हा पदभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून सहा वर्षासाठी किंवा वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी निश्चित झाला होता. अधिसूचनेत तसे नमूद करण्यात आले आहे. किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर हे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी होते. मात्र, सेवा निवृत्त झाल्यामुळे पुन्हा ते पद रिकामे झाले होते.
राजे निंबाळकर यांची विक्रमी कामगिरी
किशोर राजे निंबाळकर यांना एमपीएससी अध्यक्ष म्हणून १ वर्ष ११ महिन्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ मिळाला. त्यात विक्रमी काम आयोगाने केले. २०२१ मध्ये आयोगाने २७५ जाहिराती दिल्या, पदसंख्या होती ५ हजार ४७, मुलाखती घेतल्या ७७९ आणि शिफारशी केल्या ९९. २०२२ मध्ये १०८ जाहिराती आयोगाने दिल्या. पदसंख्या होती, ६५७६, मुलाखती घेतल्या ७४१९ आणि शिफारशी केल्या ४९७७. तसेच, २०२३ मध्ये ६० जाहिराती दिल्या, पदसंख्या होती १० हजार ५२९ , मुलाखती घेतल्या ९३३५ आणि नोकरीसाठी शिफारशी केल्या ३९२८.