पिंपरी-चिंचवडला मिळाले आणखी एक डीसीपी
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – दत्तात्रय माने
पुणे – पुरेशा मनुष्यबळासह इतर मुलभूत सोयीसुविधांसाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हे स्थापनेला पाच वर्षे झाली, तरी अद्याप झगडतच आहे. त्यामुळे एकेका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे एकापेक्षा अधिक चार्ज आतापर्यंत होते. महिन्यापूर्वी दोन डीसीपी आल्याने हा लोड कमी झाला. मंगळवारी आणखी एक डीसीपी आल्याने डबल पदभार असलेल्या दोन डीसीपींना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्याच्या गृह विभागाने मंगळवारी अॅडिशनल एसपी लेवलच्या दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात एक महिला आयपीएस आणि दुसरे राज्य पोलिस सेवेतील (मपोसे) अधिकारी आहेत. सांगली जिल्ह्याच्या अॅडिशनल एसपी आंचल दलाल या आयपीएसची बदली त्याच पदावर शेजारच्या सातारा येथे करण्यात आली.
साताऱ्याचे अॅडिशनल एसपी म्हणजे अपर पोलीस अधिक्षक बापू बांगर यांची बदली डीसीपी म्हणून पिंपरी-चिंचवडमध्ये केली गेली आहे. हे त्यांचे प्रमोशन आहे. डीसीपी, पिंपरी-चिंचवड हे पद अॅडिशनल सीपी तथा अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाचे आहे. ते बांगरांसाठी डीसीपी लेवलपर्यंत खाली आणण्यात आले आहे.
दरम्यान, बांगर यांच्या येण्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन डीसीपींची डबल चार्जमधून आता सुटका होणार आहे. सध्या स्वप्ना गोरे यांच्याकडे गुन्हे आणि मुख्यालय (एचक्यू) अशा दोन जबाबदाऱ्या आहेत. तर, दुसरे डीसीपी शिवाजी पवार यांच्याकडे वाहतूक आणि विशेष शाखेचा (एसबी) चार्ज आहे.
गुन्हे शाखेसाठी स्वतंत्र डीसीपी देऊन एचक्यू आणि एसबीची जबाबदारी एका अधिकाऱ्याकडे आता दिली जाण्याची शक्यता आहे. नवीन डीसीपी बांगर यांना गुन्हे शाखेची सूत्रे दिली, तर ती गोरे यांच्याकडे एचक्यू आणि एसबीचा पदभार दिला जाऊ शकतो. ते बांगर येथे हजर झाल्यावर लगेच स्पष्ट होणार आहे.