साहेब म्हणतात, ” मागून वाहने काढा “
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मदीले
भिवापूर :- पवनी व लाखांदूर तालुक्यातून येणारी वाळूची वाहने निष्टी, भुयार, मेंढेगाव (जी. भंडारा ), कान्पा, भिसीमार्गे (जी. चंद्रपूर ) उखळी फाटा (ता. भिवापूर) व तिथून पुढे वर्धा, अमरावती, नागपूर अशी वळसा घालून जात आहेत. भिवापूर शहरातून न जाता मागच्या रस्त्याने वाहतूक करा, अशा साहेब मंडळींच्या सूचना आहेत. त्यांच्या सुचना वाहन मालकांना खर्चिक ठरत असून मागच्या रस्त्याने वाहने काढतांना चंद्रपूर जिल्ह्यातील एन्ट्रीचा अधिकचा भुर्दंड वाहन मालकांना सोसावा लागत आहे.
चार दिवसांआधी तहसीलची एन्ट्री सुरु झाली. उमरेड येथील दोघे तर भिसी (जी. चंद्रपूर) येथील एक जण एन्ट्रीचे काम सांभाळतात. इतर मोटार मालकांकडून एन्ट्री जमा करून ती साहेब मंडळींना पोहचविन्याचे काम ते करतात. त्यात प्रती वाहन एक हजार त्यांचे कमिशन असते. एन्ट्री सुरु करतांना साहेब मंडळींनी एक अट घालून दिली आहे.
‘मोजकीच वाहने भिवापूर शहरातून तर उरलेली वाहने उखळी फाटा मार्गे जातील ‘. अशी ती अट आहे. एन्ट्री घेत असल्याचा अधिक गवगवा व्हायला नको, यासाठी साहेब मंडळी सावधगिरी बाळगत आहेत. सगळीच वाहने भिवापूर मार्गे गेली तर साहेब ‘ सेट ‘ झाल्याचा भिवापूरकरांना संशय येऊ शकतो. तसं होऊ नये याकरिता निवडक वाहने भिवापूर वरून तर उरलेली बहुतांश वाहने उखळी मार्गे न्या असा त्यांचा आग्रह आहे.
—-> वाहन मालकांवर अधिकचा भुर्दंड
मागच्या मार्गाने म्हणजे उखळी (ता. भिवापूर ) फाटा मार्गे वाहन काढतांना भिसी ( ता. चिमूर ) हद्दीमधून जावे लागते. त्याकरिता भिसीच्या साहेब लोकांना मॅनेज करावे लागते. हा अधिकचा भुर्दंड वाहन मालकांना सहन करावा लागत आहे.
—-> लाखोच्या एन्ट्रीत वाटेकरी कोण ?
एन्ट्रीच्या नावावर दर महिन्याला दिडशेच्या जवळपास वाहनांकडून लाखोचा मलीदा साहेबाकडे जमा होत आहे. या मलिद्यात वाटेकरी किती? हा येथे चर्चेचा विषय आहे. जमा केलेल्या मलिद्यातील काही वाटा मोठ्या साहेबांच्या खिशात जात असल्याचे बोलले जाते. साहेबांचा वाहन चालकही या मलीद्याचा वाटेकरी असल्याचे समजते.



