DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अजगरभाई मुल्ला
चाळीसगाव:- डाळिंब बागेची छाटणी करण्यासाठी पैठणकडे जाणाऱ्या मजुरांच्या तवेरा गाडीला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एस. टी. बसची जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात मालेगाव तालुक्यातील दोन जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये तवेराचालक व मजुराचा समावेश आहे.
या अपघातात तवेरामधील नऊ मजूर व बसमधील नऊ प्रवासी असे १८ जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना मालेगाव येथे हलविण्यात आले आहे. चाळीसगाव- मालेगाव रस्त्यावरील देवळी गावाजवळ हा भीषण अपघात झाला.
या घटनेची माहिती अशी, की सावतावाडी (ता. मालेगाव) येथील १० मजूर पैठण तालुक्यात डाळिंबाची छाटणी करण्याच्या कामासाठी तवेरा गाडीने (क्रमांक- एम. एच. ०४ सीटी २४९२) होते. गाडीत चालकासह ११ जण होते. चाळीसगाव- मालेगाव रस्त्यावरील देवळी गावाजवळून जात असताना समोरून मालेगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एस. टी. बसने (क्रमांक- एम. एच. १४ बीटी ०३७५) चुकीच्या बाजूने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यात बसने तवेरा गाडीला काही अंतरावरपर्यंत घसरत नेले.
धडक बसताच तवेराचा पुढचा भाग पूर्णपणे दाबला गेला. अपघाताच झाल्याचे कळताच आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्यांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तवेरामधील जखमींना बाहेर काढण्यासाठी अक्षरशः कसरत केली. अपघाताची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांना समजताच त्यांनी उपनिरीक्षक विकास शिरोळे, जालमसिंंग पाटील, गोपाल पाटील, मिलींद शिंदे, नीलेश लोहार, अशोक राठोड, सुदर्शन घुले, गोरख चकोर, भूषण बाविस्कर, अशोक राठोड, दीपक नरवाडे, ईश्वर देशमुख यांना घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने सर्व जखमींना तत्काळ दवाखान्यात दाखल केले.
या भीषण अपघातात तवेराचालक शेख रहेमान शेख बाबू (वय ३५, रा. अजंग, ह. मु. मालेगाव) व शरद लाखू माळी (वय ३१, रा. सावतावाडी, ता. मालेगाव) हे दोघे जागीच ठार झाले. तर सुनील बाळू पवार, जयवंत नारायण माळी, शंकर काशिनाथ पवार, किशोर सुकलाल सोनवणे, संदीप तुळशीराम माळी, अर्जुन देविदास पवार, भरत लाखू माळी, जयराम मोतीराम माळी, शाम रघुनाथ सोनवणे हे नऊ प्रवासी जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यासह सर्व जखमींना पुढील उपचारार्थ मालेगाव येथे हलविण्यात आले आहे.
या अपघातात बसमधील पदमाकर चिंतामण पाटील, रमाबाई पदमाकर पाटील, जिभाऊ शामराव खैरनार, मजासजी मुनीरशहा फकीर (सर्व रा. टाकळी प्र.दे., ता. चाळीसगाव), दिलीप नथू निकम, द्वारकाबाई दिलीप निकम (रा. पाडळदे, ता. भडगाव), सोपान चिंधा पाटील (रा. कजगाव) व निशा चव्हाण (रा. ओढरे, ता. चाळीसगाव) हे प्रवासी जखमी झाले.
या सर्वांवर चाळीसगाव येथील ॲड. वाय. पी. पाटील ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये डॉ. अभिजित पाटील यांनी उपचार केले. पाच प्रवाशांवर किरकोळ मार लागल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच तहसीलदार प्रशांत पाटील, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी, अधिकार निकम यांनी रूग्णालयांमध्ये रूग्णांची विचारपूस केली.
अपघाताच्या घटनेची माहिती कळताच तहसीलदार प्रशांत पाटील यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. मृतांच्या नातेवाईकाचे सांत्वन केले. यावेळी सावतावाडीचे सरपंच दीपक मोहिते, उपसरपंच बापू शिंदे व भारत वेताळ उपस्थित होते.
सावतावाडीचे सरपंच दीपक मोहीते व उपसरपंच बापू शिंदे, सदस्य भारत वेताळ यांनी घटनास्थळी भेट दिली. हवालदार मिलिंद शिंदे, नीलेश लोहो व अशोक राठोड यांनी रुग्णालयात जखमींचे जबाब घेतले.
जखमींना मालेगाव येथे दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिकेकरिता आर्थिक अडचण येत असल्याचे जखमींच्या नातलगांकडून समजताच तहसीलदार प्रशांत पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने रुग्णवाहिकेची व्यवस्था करुन दिली. त्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक मदतही त्यांनी स्वतःतर्फे दिली. तहसीलदारांच्या या माणुसकीच्या दर्शनाने नातलग भारावले होते.