अपघात घडू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक सूचना
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
उमरेड:- नुकताच भिवापूर तालुक्यातील मौजा तास येथे झालेला भीषण अपघात लक्षात घेता या पुढे असे अपघात घडू नयेत म्हणून माजी आ. राजू पारवे यांनी रविवारी उमरेड पोलीस ठाण्यात बैठक घेत पोलीस प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या.
भिवापूर तालुक्यातील तास येथे नुकताच ट्रॅव्हल व ट्रकचा भीषण अपघात झाला होता. यात काहींना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. या पुढे असे अपघात घडू नयेत यासाठी माजी आमदार राजू पारवे यांनी रविवारी उमरेड पोलीस ठाण्यात महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी प्रतिबंधात्मक उपाय योजनांवर सविस्तर चर्चा झाली. प्रामुख्याने खासगी वाहतूकदार ट्रॅव्हल्समध्ये अतिरिक्त प्रवाशी कोंबत नागरिकांच्या जीवाशी खेळतात याकडे लक्ष वेधून याविरुद्ध कडक पावलं उचलावीत अशी सूचना राजू पारवे यांनी केली. डब्ल्यू. सी. एल. परिसरात उमरेड राज्यमार्गावर दोन्ही बाजूंनी ट्रकच्या रांगा लागलेल्या असतात, ज्यामुळे अपघाताचा धोका उद्भवतो. या विरुद्ध सक्त कारवाई करण्यात यावी अशी सूचनाही या प्रसंगी केली. तसेच शेतकरी बांधवांची अडवणूक करून वाहतूक पोलिसांनी त्यांच्याकडून अवैध वसुली करू नये हा विषय देखील राजू भाऊ पारवे यांनी प्राधान्याने मांडला. बैठकीस मंगेश इंगळे वाहतूक नियंत्रक, अनिल राऊत, पोलीस निरीक्षक उमरेड, जयप्रकाश निर्मल पोलीस निरीक्षक भिवापूर पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह शहरातील पत्रकार बंधू तथा दक्ष नागरिकांची उपस्थिती होती.