DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – प्रा. नागेंद्र जाधव
चंदगड:- चंदगड तालुक्यातील चोरीछुपे सुरु असलेल्या शिनोळी येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून शुक्रवारी रात्री रोख रकमेसह पावणे सात लाखांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या कोल्हापूर विभागाने जप्त केला आहे.तर जुगार खेळणाऱ्या ५८ जणांवर गुन्हा दाखल केल्याने अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. चंदगड तालुक्यातील अवैध धंदे आणि त्याला कुणाचा वरदहस्त लाभलेला आहे हा चर्चेचा विषय बनला आहे. सदर घटनेने चंदगड पोलीस खडबडून जागे झाले आहेत.
या कारवाईमध्ये राजू मसणू सरोळकर रा. शिरगाव, सुनिल शहाजी माने, इनायत उस्मान मुल्ला, सुरेश जग्गनाथ संकपाळ तिघेही रा. चंदगड, पुंडलिक सटूप्पा सावंत रा. हलकर्णी, भारत मास्तमर्डी, बाळू तहसीलदार, संदीप बोळेंद्रे, स्वप्नील घोडके, बाळू सुतार व संतोष मेणसे यांच्यासह बेळगाव, खानापूर अशा विविध ठिकाणांवरील ५८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शिनोळी-देवरवाडी रस्त्यावरील जुगार अड्ड्यावर छाप्यात रोख रक्कम १ लाख २० हजार, साडे पाच लाखांचे ५५ मोबाईल हँडसेट, जुगाराचे साहित्य असा एकूण ६ लाख ७८ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई सहाय्य्क पो. नि. चेतन मसुटगे यांच्या नेतृत्वाखाली पो. हे. कॉन्स्टेबल दिपक घोरपडे, रामचंद्र कोळी, सागर चौगले, सतीश जंगम, वसंत पिंगळे, महेश आंबी, समीर कांबळे, राजू कांबळे, यशवंत कुंभार, यांनी केली आहे.
चंदगड पोलिसांकडून अवैध धंद्याबाबत कठोर पाऊले उचलली जात नाहीत. चंदगड पोलीस यांना या कारवाई बाबत कोणतीच कल्पना नसल्याने, चंदगड, हलकर्णी आणि पाटणे फाट्यावर सुरु असलेल्या गांजा, बनावटी दारू,जुगार व मटक्यावर चंदगड पोलीसांकडून कारवाई होणार का? अशी संतप्त विचारणा नागरिकांकडून होत आहे.