सोमनाळा मार्गावरील घटना
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
भिवापूर :- भरधाव दुचाकीच्या धडकेत शेळ्या राखणाऱ्या एकाचा मृत्यू झाला. सदर घटना मंगळवारी (दि. 26) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास भिवापूर सोमनाळा मार्गावर घडली.
शरद फत्तू सहारे 60, रा. पाऊणगाव ता. पवनी जी.भंडारा असे मृतकाचे नाव आहे. आज सायंकाळी फत्तू व त्याचे अन्य साथीदार सोमनाळा मार्गाने शेळ्या हाकत भिवापूरच्या दिशेने येत होते. भिवापूर पासून एक किमी अंतरावर समोरून भरधाव आलेल्या पल्सर मोटार सायकलने (क्र. एमएच 40 सीवाय 1493) फत्तूला जोरात धडक दिली. यात त्याच्या डोके व पायाला जबर मार बसला. उपचारासाठी त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दुचाकी चालक प्रियांशु प्रकाश शेंडे 19, रा. पीपलडोह ता. उमरेड व दुचाकीवर मागे बसलेला त्याचा मित्र प्रकाश चिरकूट कोल्हे रा. पुल्लर ता. भिवापूर यांच्या विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला असून ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांच्या मार्गदर्शनात हे. काँ. मधुकर सुरपाम पुढील तपास करीत आहे.