DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- अमर मोकाशी
* त्या तीन निष्पाप जीवांच्या मृत्यूस महसूल कर्मचारी कारणीभूत ?
भिवापूर :- उमरेड मार्गावरील गोंडबोरी फाट्याजवळ शनिवारी (दि. २६ एप्रिल) सायंकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातात एका पाच वर्षीय चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू झाला. या अपघातास तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांचा वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा पाठलाग हे मुख्य कारण असल्याचा आरोप होत आहे. या आरोपांना आता पाठलाग करतानाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याने अधिक बळ मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तहसील कार्यालयाचे कर्मचारी वाळू भरलेल्या टिप्परचा भिवापूरहून उमरेडकडे पाठलाग करत होते. टिप्पर चालकांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या भीतीने वाहने भरधाव पळवली आणि या पळापळीच्या गोंधळात एका टिप्परने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारांना चिरडले. यात तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, पाठलाग करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पाठराखण करीत महसूल विभागाने पाठलाग केल्याचे आरोप फेटाळून लावले होते. मात्र, घटनेच्या वेळचे मिळालेले सीसीटीव्ही फुटेज त्यांचे दावे फोल ठरवत असून, या गंभीर प्रकाराबाबत चौकशीची मागणी जोर धरत आहे.
—> सीसीटीव्हीमध्ये कैद झाले पाठलाग करतानाचे दृश्य
सीसीटीव्ही फुटेजनुसार, सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी वाळूने भरलेले टिप्पर उमरेडच्या दिशेने जाताना दिसत आहेत. याच वेळी भिवापूर वरून वाळूच्या वाहनांचा पाठलाग करीत आलेले तहसील कार्यालयाचे सरकारी वाहन ५ वाजून १७ मिनिटांनी जवराबोडी पेट्रोल पंपाजवळ थांबले आणि लगेचच उमरेडच्या दिशेने जात असलेल्या एका १२ चाकी टिप्परचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर ५ वाजून २५ मिनिटांनी तहसीलचे वाहन घाईघाईने भिवापूरच्या दिशेने परतताना आढळून आले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात ५ वाजून १८ ते ५ वाजून २० मिनिटांच्या दरम्यान घडला. या वेळेत तहसीलचे वाहन जवराबोडी ते गोंडबोरी फाट्यादरम्यान वाळूच्या वाहनांचा पाठलाग व तपासणी करीत होते. अपघाताच्या वेळी तहसील कार्यालयाच्या वाहनात चालक आणि एक तलाठी हे दोघे उपस्थित होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
—> गौण खनिज तपासणी चौकी नामधारी, कर्मचाऱ्यांचा ‘तोडपाणी’ वर जोर
वाळू, माती, गिट्टी, मुरूम यासारख्या गौण खनिजांच्या अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी येथील पारवे पेट्रोल पंपासमोर तपासणी चौकी उभारण्यात आली आहे. चौकीवर तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, पोलीस व पोलीस पाटील यांची आठ-आठ तासांची ड्युटी असते. मात्र, चौकीवर थांबण्याऐवजी तहसील कार्यालयाचे कर्मचारी महामार्गावर वाहनांचा पाठलाग करताना दिसतात. विशेषतः एक नायब तहसीलदार देखील वाळूच्या वाहनांचा पाठलाग करताना अनेकदा आढळले आहेत. चौकी असूनही महामार्गावर पाठलाग करण्याचे नेमके कारण काय, असा सवाल सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
तहसीलदारांच्या आदेशानुसार चौकीवर 24 तास महसूल आणी पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांची ड्युटी असल्याने गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाविरुद्ध या चौकीवर कारवाई होणे आवश्यक आहे. अवैध वाहतुकीचे एकही वाहन ही चौकी पार करुन समोर जायला नको. परंतु असे होतांना दिसत नाही. वाहने बेधडकपने चौकी पार करतात व पुढे जातात. मात्र पुढे त्यांच्या मागावर असलेले महसूलचे कर्मचारी या वाहनांचा पाठलाग करतात आणी तपासणीच्या नावावर तोडपाणी करतात. नंतर ‘लक्ष्मीकृपा’ झाली कि सोडून देतात. हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून अखंड सुरु आहे.



