DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी: सुनिल मैदीले
आंभोरा :- गोसीखुर्द पुनर्वसन योजनेअंतर्गत मौजा आंभोरा (खुर्द) येथील लाभक्षेत्रातील शेतजमिनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बांधकामात झालेल्या अनियमिततेविरोधात ग्रामस्थांनी घेतलेला आक्रमक पवित्रा अखेर प्रशासनाच्या आश्वासनानंतर काहीशा समाधानाने संपला. ऋषी हरिभाऊ भोंगाडे यांच्या नेतृत्वाखालील बेमुदत आमरण उपोषण माजी आमदार राजू पारवे यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले, मात्र “लढा संपलेला नाही,” असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामस्थांचा आरोप आहे की, आंभोरा ते गोन्हा मार्गावरील रस्त्याचे बांधकाम कंत्राटदाराकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेती आणि वाहतुकीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. या प्रकरणी दोषी कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित प्रशासकीय आणि फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात आली होती.
या आंदोलनाची माहिती मिळताच माजी आमदार व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पारवे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी ग्रामस्थांसोबत आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा केली. शासनाकडून उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करून २५ दिवसांच्या आत योग्य निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही पारवे यांनी दिली. त्यानंतर, ग्रामस्थांनी पारवे यांच्या हस्ते ज्यूस प्राशन करून आमरण उपोषणाची सांगता केली.
“ग्रामस्थांच्या मागण्यांकडे शासन गांभीर्याने लक्ष देत असून दोषींवर निश्चितच कारवाई केली जाईल,” असे प्रतिपादन राजू पारवे यांनी केले. मात्र, “चौकशी व कारवाई न झाल्यास संघर्ष अधिक तीव्र केला जाईल,” असा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी दिला.



