मुंबई : ऑटो सेक्टरने जानेवारी 2022 मधील वाहन विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. दरम्यान, अनेक वाहन कंपन्यांच्या विक्रीत घट झाली आहे, तर काही वाहन उत्पादकांनी प्रचंड नफा कमावला आहे. टाटा मोटर्सने जानेवारी 2022 मध्ये वाहन विक्रीत 27 टक्के वाढ केली आहे, तर देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीला मात्र या काळात फटका बसला आहे. मारुती सुझुकी इंडियाची (MSI) घाऊक विक्री जानेवारी 2022 मध्ये 3.96 टक्क्यांनी घसरून 1,54,379 युनिट्सवर आली आहे. मारुतीने मंगळवारी एका निवेदनात सांगितले की, जानेवारी 2021 मध्ये कंपनीने 1,60,752 वाहनांची विक्री केली. याशिवाय, कंपनीची देशांतर्गत विक्री गेल्या महिन्यात 8 टक्क्यांनी घसरून 1,36,442 वाहनांवर आली, गेल्या वर्षातील याच महिन्यात 1,48,307 होती.
इलेक्ट्रॉनिक पार्ट्सच्या कमतरतेमुळे केवळ देशांतर्गत बाजारात विकल्या जाणाऱ्या वाहनांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सेलवर परिणाम झाला आहे. जानेवारीत वाहनांच्या विक्रीत कोणत्या कंपनीला तोटा झाला आणि कोणाला नफा झाला ते जाणून घेऊया…
Hyundai Motor India च्या विक्रीत घट
वाहन कंपनी Hyundai Motor India ची एकूण विक्री जानेवारी 2022 मध्ये 11.11 टक्क्यांनी घसरून 53,427 युनिट झाली. कंपनीने मंगळवारी ही माहिती दिली. जानेवारी 2021 मध्ये कंपनीने 60,105 वाहनांची विक्री केली होती. कंपनीच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिन्यात त्यांची देशांतर्गत विक्री 15.35 टक्क्यांनी घसरून 44,022 युनिट्स इतकी झाली आहे. वर्षभरापूर्वी याच महिन्यात 52,005 मोटारींची विक्री झाली होती. याशिवाय जानेवारी 2022 मध्ये कंपनीची निर्यात 9,405 युनिट्सपर्यंत वाढली आहे. जानेवारी 2021 मध्ये कंपनीने 8,100 युनिट्सची निर्यात केली होती.
निसान इंडिया नफ्यात
निसान इंडियाने जानेवारी 2022 मधील विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. कंपनीने या वर्षाच्या पहिल्या महिन्यात 4,250 युनिट्सची घाऊक विक्री केली असून, गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 5 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. जपानी ब्रँडने निसान आणि डॅटसन वाहनांच्या 1,224 युनिट्सची भारतातून परदेशात निर्यात केली. कंपनी सध्या भारतातून नेपाळ, बांगलादेश, भूतान, श्रीलंका, युगांडा, झांबिया, केनिया, सेशेल्स, मोझांबिक, मॉरिशस, ब्रुनेई, टांझानिया आणि मलावीसह 15 देशांमध्ये आपले प्रोडक्ट्स निर्यात करते.
होंडा कार्स इंडियाच्या विक्रीत घट
Honda Cars India ची जानेवारी 2022 मध्ये देशांतर्गत बाजारात वर्ष-दर-वर्ष (YoY) विक्री 7.88 टक्क्यांनी घसरून 10,427 युनिट्सवर गेली आहे, कंपनीने गेल्या वर्षी याच महिन्यात 11,319 युनिट्सची विक्री केली होती. याच कालावधीत कंपनीची निर्यात 39.65 टक्क्यांनी वाढून 1,722 युनिट्सवर पोहोचली, जी गेल्या वर्षीच्या याच महिन्यात 1,233 युनिट्सची होती. एकंदरीत (देशांतर्गत आणि निर्यातीसह), कंपनीने जानेवारी 2022 मध्ये 12,149 युनिट्सची विक्री केली, जी जानेवारी 2021 मध्ये 12,552 युनिट्सच्या तुलनेत 3.2 टक्क्यांनी कमी आहे.