ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
ममता बॅनर्जी
कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा प्रादेशिक पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. येत्या लोकसभेमध्ये म्हणजे 2024 साली होणाऱ्या निवडणुकीत भाजपला पराभूत करायचं असेल तर देशातील सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र यावं असं त्यांनी म्हटलं आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “आपला पक्ष यूपीमध्ये निवडणूक लढवत नाही. पण येत्या 8 फेब्रुवारी रोजी अखिलेश यादव यांच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी प्रचाराला जाणार आहे. आम्ही आता इतर राज्यांमध्ये निवडणुका लढवण्याची तयारी केली असून त्याची सुरुवात गोव्यापासून होत आहे. आमच्याकडे आता दोन वर्षे आहेत. या काळात आम्ही पक्ष संघटना बळकट करण्यावर भर देणार आहे. 2024 सालच्या निवडणुकीत 42 पैकी 42 जागा या तृणमूलच्या पारड्यात पडतील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.”
ममता बॅनर्जींची पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवडणूक बिनविरोध पार पडण्यात आली. तृणमूलच्या अध्यक्षपदाची निवडणूक दर पाच वर्षांनी घेतली जाते.
ममता बॅनर्जी यांनी 1998 साली काँग्रेसचा राजीनामा दिला आणि त्यांनी तृणमूलची स्थापना केली. तेव्हापासून आतापर्यंत त्याच पक्षाच्या अध्यक्षा आहेत. 2011 साली डाव्या पक्षांना मात देऊन त्यांनी पश्चिम बंगालची सत्ता हस्तगत केली. गेल्या वर्षी पार पडलेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने 294 पैकी 214 जागा जिंकल्या आहेत.