DPT NEWS -(फुलचंद वानखेडे)अकोला : शेगावच्या सराफा व्यावसायिकाला अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून पोलिस कोठडीत अमानुष मारहाण व अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षकासह पाच जणांना आधीच निलंबित केले होते. त्यानंतर काल पुन्हा या प्रकरणात महिला कर्मचारी गीता अवतारला सुद्धा निलंबित करण्यात आले. यामध्ये एकूण सहा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.
शेगाव येथील एका सराफा व्यावसायिकाला 9 जानेवारीला अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण आणि शिपाई शक्ती कांबळे यांनी चोरीचे सोने खरेदी प्रकरणी रात्री 3 वाजता शेगावातून अटक केली होतीय. शेगावातून अकोल्यात आणतांना गाडीतच आरोपीला प्रचंड मारहाण करण्यात आली. रविवारी आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. या दोन दिवसांत आरोपी सराफा व्यापाऱ्याला एपीआय चव्हाण आणि काँस्टेबल कांबळे याने उलटे करून मारहाण केल्याचा आरोप होता.
सोबतच इतर आरोपींकरवी त्याच्यावर अत्याचार केले. इतकेच नव्हे तर पोलिसांनी अंगावर गरम पाणीसुद्धा फेकले. पोलिस कोठडी संपल्यानंतर जेव्हा आरोपी बाहेर आला तेव्हा त्यांनी पोलिसांवर आरोप केले. पोलिसांच्या धाकापोटी आपण न्यायालयालासुद्धा सांगू शकलो नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी पोलिस अधीक्षकांकडे सराफा व्यावसायिकांनी तक्रार केली.
या तक्रारीनंतर पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी बुलडाणा येथील अप्पर पोलिस अधीक्षकांकडे चौकशी सोपवली होती. त्यांच्या चौकशीत दोषी आढळून आल्यानंतर पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी एकापाठोपाठ एका पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यामध्ये सहायक पोलिस निरिक्षक नितीन चव्हाण, पोलिस शिपाई शक्ती कांबळे, वीरेंद्र लाड, माँटी यादव, संदीप काटकर, चालक दिलीप पवार, महिला कर्मचारी गीता अवचार यांचा समावेश आहे.
पोलिस कोठडीमध्ये आरोपीला मारहाण झाल्याचे प्रकरण गृहराज्यमंत्री यांच्याकडे पोहाेचल्यानंतर या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून, आता पुढील कारवाई काय होते, याकडे पोलिस वर्तुळाचे लक्ष लागून आहे.