प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -कृषिपंपाचे वीजबिल आज भरू , उद्या भरू असे म्हणत महावितरणच्या कृषी वीज धोरणात 50 टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ 50 दिवस उरले आहेत . येत्या 31 मार्चला 50 टक्के माफीची मुदत संपणार असून , एप्रिलपासून बिलात फक्त 30 टक्के माफी मिळणार आहे . त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदत संपण्याची वाट न पाहता अभियानात सहभागी होऊन आपल्या कृषिपंपाची थकबाकी तसेच चालू बिले भरून 50 टक्के माफी मिळवावी तसेच वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की टाळावी , असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे . जिल्ह्यात वीजबिल वसुलीस प्रतिसाद मिळत आहे . ज्या गावात वसुली , त्याच गावात काम असा निकष ठेवल्याने अनेक’ बिल गावे वसुलीसाठी पुढे येत आहेत . कृषी वीज धोरण शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी शेतीच्या बांधावर , गावच्या पारावर मेळावे घेतले जात आहेत . एक गाव एक दिवस ‘ मोहिमेत गावातील विद्युत समस्या सोडवल्या जात आहेत . असे असले तरी आज भरू , उद्या भरू’च्या मानसिकतेमुळे एक वर्ष निघून गेले असून , आता फक्त 50 दिवस उरले आहेत . जिल्ह्यात धोरणापूर्वी शेतीची थकबाकी 796 कोटींच्या घरात होती . दंड – व्याजातील सूट , निर्लेखन व बिल दुरुस्ती समायोजनातून जवळपास 281 कोटी माफ झाले आहेत . तर सुधारित थकबाकीतही 50 टक्के थकबाकी माफ होत असल्याने शेतकऱ्यांना 50 टक्के हिश्श्यापोटी 258 कोटी अधिक सप्टेंबर 2020 पासूनचे चालू बिल 117 कोटी असेमिळून फक्त 375 कोटी भरायचे आहेत . या देय रकमेपोटी आतापर्यंत 36 कोटी 50 लाखांचा भरणा वर्षभरात झालेला आहे . योजनेसाठी पात्र असलेल्या 58 हजार 470 शेतकऱ्यांपैकी 25 हजार 345 शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला असला तरी केवळ 5572 शेतकऱ्यांनीच योजनेचा संपूर्ण लाभ घेतला आहे . तर उर्वरित शेतकऱ्यांनी फक्त कारवाई टाळण्यासाठी जुजबी रक्कम भरलेली आहे .
सुधारित थकबाकीतील 50 टक्के सवलतीचा लाभ केवळ 31 मार्च 2022 पर्यंतच मिळणार आहे . 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या काळात 30 टक्के तर 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत केवळ 20 टक्के सवलत सुधारित थकबाकीत मिळणार आहे . त्यामुळे 50 टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 31 मार्च 2022 पूर्वी थकबाकी व चालू बिले भरणे आवश्यक आहे . तसेच या योजनेत सुधारित थकबाकी भरून थकबाकीमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना सप्टेंबर- 2020 नंतरची सर्व चालू वीजबिले गरजेचे आहे .
तरच त्यांना योजनेचा संपूर्ण लाभ मिळणार आहे .
वसूल रक्कमेतील 33 टक्के रक्कम गाव पातळीवर व 33 टक्के रक्कम जिल्हा पातळीवर विजेच्या पायाभूत कामांत वापरली जात असल्याने पैसे भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज समस्यांतून मुक्तता होत आहे . वसुलीमुळे उपलब्ध झालेल्या कृषी आकस्मिक निधीतून आतापर्यंत 7511 कृषी वीज जोडण्या देण्याचे काम झाले आहे . तसेच नवीन उपकेंद्रे व नवीन वितरण रोहित्रे उभारण्यासह त्यांची क्षमतावाढही केली जाणार आहे .
शेतकऱ्यांनी वीजबिले भरली तरच त्यांना सुरळीत व पुरेशा दाबाने वीज देणे महावितरणला शक्य होईल . याशिवाय नवीन शेतकऱ्यांना तातडीने वीज जोडण्याही उपलब्ध होतील . त्यामुळे या योजनेचा लाभ घेऊन उर्वरित शेतकऱ्यांनी बिले भरावीत . यात सप्टेंबर -2020 नंतरची सर्व सहा चालू वीजबिले बंधनकारक आहे . शेतकऱ्यांनी बिल भरून सहकार्य करावे ,
असे आवाहन मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे .