शहादा (रवींद्र गवळे) : ११२ आपत्कालीन हेल्पलाइन नंबर डायल करणे जयनगर (ता. शहादा) येथील तरुणास चांगलेच महागात पडले असून, त्याच्याविरोधात सारंगखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. १०) पहाटे साडेचारच्या सुमारास सारंगखेडा पोलिस ठाण्याला शासकीय वाहन एमडीटी क्र. मोबा- १ वर डायल ११२ या हेल्पलाइन क्रमांकावरून नियंत्रण कक्ष, नंदुरबार येथून सीएसएफ आयडीवरून कॉलरचा संदेश प्राप्त झाल्याने कॉलरच्या मोबाईलवर संपर्क साधून विचारपूस केली असता कॉलरने कळविले, की तुम्ही जयनगर (ता. शहादा) या गावी लागलीच येऊन मला पोलिस ठाण्यात घेऊन चला; मला तक्रार द्यायची आहे. असे कळविल्याने तत्काळ पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन कॉलरला घडलेल्या घटनेबाबत विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली व तक्रार देण्यास नकार देऊन हसत होता.
तपासात आले समोर
कॉलरने डायल ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर विनाकारण कॉल करून लोकसेवकास त्रास होईल हे माहिती असतानादेखील खोटी माहिती दिली. म्हणून त्यास पोलिस ठाण्यात आणले व पुन्हा विचारपूस करता त्याची कुठलीही तक्रार नसताना टाइमपास म्हणून फोन केल्याचे निष्पन्न झाले. त्याअनुषंगाने त्याच्याविरुद्ध सारंगखेडा पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई मधुकर ठाकरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यास ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कारवाई सुरू आहे.
डायल ११२ या हेल्पलाइनचा चांगल्या कामासाठी उपयोग करावा, त्याचा दुरुपयोग करू नये. डायल ११२ ही आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत मिळण्यासाठीची टोल फ्री हेल्पलाइन आहे. त्यामुळे विनाकारण या हेल्पलाइनला कॉल करू नये, अशामुळे ज्यांना खरोखर मदतीची आवश्यकता आहे, अशा ठिकाणी मदत पोचण्यास विलंब होत असतो.
-राजेश शिरसाठ, पोलिस निरीक्षक, सारंगखेडा पोलिस ठाणे