पाटणा : लौरिया विधानसभेचे भाजप आमदार विनय बिहारी आणि त्यांची पत्नी चंचला बिहारी यांच्या विरोधात पाटणा येथील अगमकुआं पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आमदार आणि त्यांची पत्नी चंचला बिहारी यांच्यासह समर्थक राजीव सिंह यांनाही आरोपी करण्यात आले आहे. हे प्रकरण एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या अपहरणाशी संबंधित आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे, अशी माहिती अगमकुआं पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिजीत कुमार यांनी दिली. आपल्या मेहुण्याचा मुलगा आणि मुलीचे प्रेमसंबंध आहेत. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. आमदार असल्यामुळे आपल्याही नावाचा एफआयआरमध्ये समावेश करण्यात आला आहे, असा दावा आमदार विनय बिहारी यांनी केला.
एफआयआरनुसार हे प्रकरण ९ फेब्रुवारीचे आहे. भूतनाथ रोड येथील प्रोग्रेसिव्ह कॉलनी येथे राहणारी २५ वर्षीय विद्यार्थिनी कॉमर्स कॉलेजमध्ये परीक्षा देण्यासाठी गेली होती. परीक्षा संपल्यानंतर मुलगी २ वाजेपर्यंत परत यायला हवी होती. पण ती परत आली नाही. नातेवाइकांनी शोध घेतला मात्र ती सापडली नाही. मुलीच्या मोबाइलवर कॉल केला. पण मोबाइल बंद होता. दुपारी ३.१५ च्या सुमारास मुलीच्या मोबाइलवरून मेसेज आला. एक नंबर पाठवत त्यावर कॉल करा, असे लिहिले होते. यानंतर त्यांनी मोबाइलवर कॉल केला. त्यानंतर लौरियाचे आमदार विनय बिहारी यांनी तो घेतला, असे मुलीच्या आईने एफआयआरमध्ये म्हटले आहे.
आमदारावर धमकीचा आरोप
तुम्ही तासाभराने फोन करा. तासाभराने आम्ही फोन केला. त्यावेळी मुलगी ठीक असल्याचे विनय बिहारी यांनी सांगितले. ती मेहुणा राजीव सिंह यांच्याकडे सुरक्षित आहे. तुम्हाला जिथे तक्रार करायची असेल तिथे करा. एसपी-डीएसपी कोणाकडेही जा, अशी अशी धमकी आमदारांनी दिली. राजीव सिंह यांच्या महात्मा गांधी नगर येथील घरी आम्ही गेलो. तर काय घडले हे केवळ विनय बिहारी आणि त्यांची पत्नी चंचला बिहारीच सांगू शकतील, असे कुटुंबीयांनी सांगितले. यामुळे आमदारांनी कट रचून आपल्या मुलीचे अपहरण केल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे. तिच्यासोबत काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची भीती त्यांना वाटते. या संदर्भात आमदाराच्या पत्नीला विचारण्यात आले. पण आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
‘विनाकारण गुन्हा दाखल करण्यात आला’
आपल्यावर विनाकारण गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझ्या मेहुण्याच्या मुलासोबत मुलीचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. आपल्याला २०१९ मध्ये हे प्रकरण कळले. त्यावेळी मुलीने फोन केला होता. आपलं लग्न थांबवा नाही तर विष प्राशन करून जीव देईन, असे तिने म्हटले होते. त्यानंतर आपण तिचे दुसऱ्या मुलाशी होत असलेले लग्न रोखले. मधेच करोना आला. आता मुलगा आणि मुलगी घर सोडून पळाले आहेत. माहिती मिळताच मुलाला दिल्लीहून बोलावले आणि पोलिस ठाण्याच्या हवाली केले आहे. मुलगा आणि मुलगी दोघेही पोलिस ठाण्यात आहेत. आता सर्व सत्य बाहेर येईल, असा दावा आमदार विनय बिहारी यांनी केला.