प्रतिनिधी (नंदकुमार नामदास) डोंबिवली: नवी मुंबई महापालिकेच्या बसला रविवारी दुपारी १२.४५ सुमारास भीषण आग लागली होती. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. बस दुरुस्त करत असताना बॅटरीने पेट घेतल्याने बसला आग लागली होती.
रविवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून एनएमटीची बस प्रवाश्यांना घेऊन घणसोलीकडे रवाना झाली होती. मात्र काळ्या शिळ रोड वरील मानपाडा बस अस्थानाजवळ बस आल्यानंतर बसचे ब्रेक डाऊन झाल्याचं समजताच वानचालक अंकुश आणि वाहन कृष्णा मढवी यांनी प्रवाश्यांना वाहनामधून उतरवून बस रिकामी केली होती. त्यानंतर वाहतूक कोंडी होत असल्याने बस ढकलत ढकलत मानपाडा बस स्टॉपच्या पुढे नेण्यात आली होती.
यानंतर रविवारी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास बस दुरुस्त करत असतानाच बॅटरीने पेट घेतला आणि क्षणातच आग वाढू लागली. या आगीत बस जळून खाक झाली असून परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले होते. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहनचालकांना रस्त्यावरील वाट मोकळी करून दिली आहे.
तर दुसरीकडे अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात बसचे नुकसान झाले आहे. नवी मुंबईच्या घणसोली आगारातील असल्याची माहिती नियंत्रक रमेश सरवदे यांनी दिलेली आहे.