विद्यार्थी, विद्यार्थीनी, नेते, नोकरशहांना देशपातळीवर एकच खादीचा ड्रेसकोड ठरवा .
सादिक खाटीक यांचे आवाहन .
_________________
आटपाडी दि . १३ (प्रतिनिधी )
कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न झाला आहे, तो कायमचा संपविण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थीनी नेते आणि नोकरशहांना त्यांच्या कामकाजाच्या वेळेसाठी देशपातळीवर सक्तीचा एक सारखा खादीचा ड्रेसकोड बनविण्यात यावा आणि व्यक्तीगत पेहरावावर कोणतेही निर्बंध लादण्यात येवू नये अशी समन्वयवादी भुमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक यांनी समाज आणि शासनासमोर ठेवली आहे .
भारताचे संविधान हे उदारमतवादाला आणि समतेच्या तत्वाला महत्व देणारे आहे . प्रत्येक व्यक्तीला धार्मीक आचरण, विचार स्वातंत्र, पेहराव आणि संधीची समानता मिळाली पाहीजे हे तत्व घटनेने मान्य केलेले आहे . मात्र गेली ७५ वर्षे ज्या समन्वयाने आणि उदारमतवादी दृष्टीकोन ठेवून विविध धर्मियांनी परस्पर सहमतीचे उदाहरण जगासमोर ठेवले होते . त्याला तडा देण्याचा प्रयत्न हिजाबच्या निमित्ताने झाला आहे . एखाद्या बाबीला सनदशीर मार्गाने विरोध करता येवू शकतो . तथापि एकट्या विद्यार्थीनीला झुंडीने घोषणा देत घेरून दबाव टाकणे हे निषेधार्यच आहे . मात्र त्यावरून दोन किंवा अधिक धर्मात तेढ वाढविणाऱ्यांचा उद्देश सफल होवू नये म्हणून देश पातळीवर सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थीनीना एक सारखा खादीचाच गणवेश ठरविण्यात यावा . असे स्पष्ट करून सादिक खाटीक यांनी, संपूर्ण भारतात बालवाडी ते पदव्यूत्तर शिक्षणापर्यत सर्वच शैक्षणीक संकुलात शिकताना आणि वावरताना सर्व धर्मियांना एक सारखा पोशाखाची आणि त्यात ही एकमेकांच्या धार्मिक बाबींवर अतिक्रमण न करणारी अशी सर्व समावेशी आणि चेहर्या व्यतिरीक्त संपूर्ण शरीर व्यापेल अशी खादीचीच गणवेश पद्धती अस्तित्वात आणावी . नोकरशहांना संपूर्ण देशपातळीवर एक ड्रेस कोड केला असला तरी त्याचे पालन होत नाही . खादी कोणीच वापरत नाहीत . वरिष्ट शासकीय अधिकारी तर जीन्स आणि टी शर्ट वर कामाला येतात . त्यांच्या बाबतीतही खादीच्याच गणवेशाची सक्ती करण्यात यावी . राजकीय नेते ही आपले धार्मिक वेगळेपण दाखविण्यासाठी कोणी कफनी कोणी नबाबी पेहराव करून फिरतो कोणी इंग्रजाळलेले कपडे तर कोणी लुंगी वर कोट घालुन येतो . या सर्वांनाही एक खादीचा राष्ट्रीय पोशाख ठरविण्यात यावा . या सत्तेच्या, शासन स्तरावरील सार्वजनिक वावरातील क्षणां व्यतिरीक्त व्यक्तीगत आयुष्यात त्यांनी काय घालुन वावरावे त्यावर कोणतेही निर्बंध असू नयेत . व्यक्तीगत जीवनात पगडी, टोपी किंवा अन्य कोणताही पोशाख ज्याचा त्याचा वैयक्तीक मामला मानला गेल्यास हे वाद संपुष्टात येवून एक दिवस सर्वजण एकमेकांच्या धर्म, प्रथांचा सन्मान आणि अनुकरण ही करू लागतील . हिंदूनी शेरवानी आणि मुस्लीमांनी धोतर असे पोशाख गेल्या ७५ वर्षात अनेकदा फॅन्सी ड्रेस म्हणून घातले होते . शाळा कॉलेजातील ट्रॅडिशनल डे ( गॅदरींग ) किंवा स्टुडन्ट डे ला भिन्न धर्मीय मुले दुसऱ्या धर्माचे पेहराव करून एकमेकांना सद्भावनेचा भाई चाऱ्याचाच संदेश देताहेत हे अनेक ठिकाणचे धार्मिक सौहार्दाचे चित्र आहे . मात्र नव्या वादाने या उदारमतवादाला धक्का पोहचला आहे . त्यामुळे गणवेशातून समाज एक जीव होतो का याचा ही एक प्रयोग करावा असे आवाहन ही सादिक खाटीक यांनी केले आहे .
सरकारी अनुदानातून चालविल्या जाणाऱ्या प्रत्येक संस्थेत एक सारखाच सरकारी खादीचाच पोषाख असावा . तो सर्वच शैक्षणीक संकुलाना लागु करावा . आणि जे सरकारी अनुदान घेत नाहीत मात्र त्या संकुलाना शासन मान्यता आहे अशाही ठिकाणी सर्वां सारख्या खादीच्या ड्रेस कोड ची सक्ती असावी . गरीबातल्या गरीबाला सहज परवडेल अशा सवलतीच्या दरात खादी उपलब्ध होण्यासाठी शासनाने नवे धोरण आणि गावोगाव ची वितरण व्यवस्था अंमलात आणावी . या क्रांतीकारी निर्णयामुळे खादी निर्माण करणाऱ्या केंद्रांना नवसंजीवनी मिळून करोडो सर्व सामान्य, माता भगिनींना खादी निर्मिती केंद्रावर हक्काचा रोजगार उपलब्ध होईल . त्यामुळे अर्थ व्यवस्थेचे चक्र आणि गतिमान होण्यास मदत होवू शकेल . उत्तर भारतातील अनेक मदरशांमध्ये हिंदु शिक्षक हिंदीचे शिक्षक म्हणून नोकरीस आहेत . तर काही विद्यापीठांमध्ये मुस्लीम शिक्षक संस्कृत पंडीत म्हणून शिकवितात . हे वास्तव डॉक्यूमेंटरी तयार करून सरकारी खर्चाने लोकांना दाखविण्यात यावे . शाळा महाविद्यालया मध्ये प्रार्थनेपासून पाठांतरापर्यत कोठेही धर्माची स्तृती ,काव्य, कथा, लेख यांचा वापर नित्य पाठांसाठी किंवा प्रार्थनेसाठी न करता भारतीय संविधान, मानवता आणि भारतीय परंपरेची प्रतिज्ञा यांचा नित्य पाठात तर राष्ट्रगीता चाच तेवढा प्रार्थनेत समावेश केला जावा . अशा ही भावना सादिक खाटीक यांनी व्यक्त केल्या आहेत .