बचत गटांनी कर्जाच्या रकमेतुन स्वयंरोजगार उभारावा;माजी आ चंद्रकांत रघुवंशी
प्रतिनिधी
प्रा. भरत चव्हाण
तळोदा
नंदुरबार – कुटुंबाच्या अडचणीच्या काळात घरातील स्त्रीच कामात येत असते. नगरपरिषदेच्या माध्यमातून गेल्या २० वर्षापासून सातत्याने बचत गटांना योजनांतून मदत करण्यात येत आहे.पालिकेच्या पैसा हा जनतेचा पैसा असून,बचत गटांनी घेतलेलं कर्ज वेळेवर फेडावं.बचत गटांनी कर्जाच्या रकमेतून स्वयंरोजगार उभारावा असे आवाहन शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
जागतिक महिला दिवस निमित्त नगरपरिषदेतर्फे बचत गटांच्या महिला मेळावा व दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानांतर्गत शिवणकामाचे प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांना डिजिटल शिवन मशीनचे वाटप करण्यात आले.त्या वेळी रघुवंशी बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी चेन्नई येथे असल्यामुळे ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून त्यांनी महिला दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, नगरपालिकेकडून ज्या महिलांनी शिवणकामाचे प्रशिक्षण घेतलं असेल त्यांना शिवण मशिन देण्यात येईल. कुटुंबाच्या अडचणीच्या काळात घरातील स्त्रीच कामात येत असते त्यामुळे समाज तिच्या आदर करतो. माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांनी महिलांना राजकीय आरक्षण दिलं तर राज्य सरकारने महिलांना सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी ५० टक्के वाटा मिळवून देत कायदा केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख अतिथी सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करणवाल व तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी उपस्थित बचत गटांच्या महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानांतर्गत शिवणकामाचे प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांना डिजिटल शिवन मशीनचे वाटप व प्रमाणपत्र तसेच महिला बचत गटांना नगरपरिषदेच्या माध्यमातून मंजूर कर्ज आदेशाचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे, महिला व बालकल्याण सभापती मंगलाबाई माळी, आरोग्य सभापती मेमन मेहरुन्निसा अ.गनी, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, शिक्षण सभापती राकेश हासानी, नगरसेविका सोनिया राजपूत, भारती राजपूत,मनिषा वळवी,ज्योती पाटील, भावना गुरव, नंदा जाधव, कल्याणी मराठे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानसी मराठे तर सूत्रसंचालन प्राध्यापक माधव कदम यांनी केले.