नंदुरबार – (रविंद्र गवळे)
शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांची तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ई- केवायसी जागरुकता सप्ताह निमित्ताने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी आयटीसी मिशन सूनहरा कल, आकांक्षीत जिल्हा कृषि विकास कार्यक्रम, नंदुरबार तर्फे तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर, कृषी विज्ञान केंद्र नंदूरबारचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.राजेंद्र दहातोंडे, डॉ.हेडगेवार सेवा समिती नंदूरबारचे प्रशासकीय अधिकारी उमेश शिंदे, विकास अधिकारी अनिल पाटील, प्रकल्प प्रमुख तृप्ती चोरमले आदी उपस्थित होते.
या रथामार्फत पुढील 10 दिवस नंदुरबार जिल्ह्यातील विविध गावांना जाऊन सर्व कृषी योजनांविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत पशूधन विमा योजना, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री जन धन योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री किसान मानधन योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, मुख्यमंत्री सौर पंप योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, राज्य कृषी यंत्रीकरण योजना, स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, फसल बीमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अशा विविध योजनांबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
यावेळी श्रीमती खत्री यांच्या हस्ते कृषी विषयक शासकीय योजनेच्या पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.