कर्जत :- प्रतिनिधी पत्रकार रविंद्र विष्णू जाधव यांना रायगड जिल्हा परिषदेकडून दिला जाणारा मानाचा रायगड भूषण पुरस्कार जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी यांच्या हस्ते देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. रायगड भूषण हा पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
रविंद्र विष्णू जाधव हे उच्चविद्याविभूषित असून त्यांनी पत्रकारितेमध्येही वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका मिळवलेली आहे. जाधव यांच्यावर फुले शाहू आंबेडकरी विचारांचा प्रभाव असून त्यांना सामाजिक प्रबोधनाची प्रचंड आवड आहे. त्या अनुषंगाने महापुरुषांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सर्व सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी रविंद्र जाधव यांच्या मनात प्रेरणा निर्माण झाली या विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून एक छंद, आवड आणि गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. फुले शाहू आंबेडकरांचे विचार तळागाळातील माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध प्रकारची धम्म शिबिरे, प्रवचने व्याख्याने तसेच पहिली ते चौथीच्या मुला-मुलींना दरवर्षी शालोपयोगी साहित्य वाटप केले जातात. सामाजिक धार्मिक कार्यात हिरिरीने सहभाग घेऊन आदिवासी, ठाकूर, ओबीसी विद्यार्थ्यांना शासकीय सवलती मिळवून देणे, कर्ज काढून देणे, संजय गांधी निराधार योजनेतून वृद्धांना पेन्शन मिळवून देणे अशा एक ना अनेक सवलती मिळवून देऊन काही लोकांचा रोजीरोटीचा प्रश्न देखील त्यांनी मार्गी लावला आहे.
पत्रकार रविंद्र जाधव यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा रायगड जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय रायगड जिल्हा मित्र फाऊंडेशन खालापूर तालुका माजी उपाध्यक्ष, खालापूर महात्मा गांधी तंटामुक्ती गाव कमिटी सदस्य, गाडगे महाराज स्वच्छता अभियान माजी सदस्य, खालापूर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघ खालापूर तालुका माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ खालापूर तालुका अध्यक्ष भूषवित आहेत.
शिवाय रविंद्र जाधव यांना अखिल भारतीय पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली यांच्याकडून उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाला असून त्रिमूर्ती ग्राहक कृषी व आरोग्य आधार संस्था मुंबई यांच्याकडून डायमंड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार मिळाला आहे. तसेच साप्ताहिक हक्कासाठी आंदोलन तर्फे निर्भीड पत्रकार पुरस्कार, भारतीय मानव विकास सेवा संघ ठाणे महाराष्ट्र राज्य मानपत्र यांच्याकडून राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप २००९ , रायगड टाईम्स तर्फे आदर्श पत्रकार पुरस्कार, दलित पॅंथर संघटने कडून खालापूर भूषण पुरस्कार , पोलिस मित्र संघटने कडून सामाजिक कार्यकर्ता म्हणून सन्मान, मावळ वार्ता टिव्ही चॅनल लोणावळा येथील १६ व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने १५ मे २०१७ चा उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित, समाजमित्र पुरस्कार २०१७, साप्ताहिक महाराष्ट्राची भूमी या दीपावली विशेषांकासाठी सन २०१८ मध्ये राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने उल्हासनगर येथे सन्मानित करण्यात आले आहे. असे अनेक पुरस्कार रविंद्र जाधव यांना मिळाले आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना यंदाचा रायगड जिल्हा परिषदेकडून दिला जाणारा मानाचा रायगड भूषण पुरस्कार जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार बाळाराम पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, राजिपचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, आघाडीचे गटनेते अॅड. आस्वाद पाटील, अर्थ व बांधकाम सभापती नीलिमा पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती गीता जाधव, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बबन मनवे, पनवेल नगरपालिका माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्व पक्षांचे पक्षप्रतोद, जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी उपस्थित होते.