प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार – जागतिक महिला दिनानिमित्त देशासह राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी व अमलदार यांची मोटार सायकल रॅली आयोजित केली होती . महिलांना सन्मान मिळण्या बरोबरच हेल्मेट वापरा बाबत जनजागृती करणे हा मोटार सायकल रॅली मागील मुख्य उद्देश होता .
सदर मोटार सायकल रॅलीच्या वेळी पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , उप विभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार सचिन हिरे यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील इतर अधिकारी व नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सुमारे १२५ महिला पोलीस अधिकारी व महिला अर्मलदार हेल्मेटसह सहभागी झाले होते . नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पहिल्यांदाच महिला पोलीस अधिकारी व अमलदार यांची मोटार सायकल रॅलीचे आयोजन केल्यामुळे ती पाहण्यासाठी नंदुरबार शहराच्या रस्त्यावर लोकांनी प्रचंड गर्दी केली होती . सदर मोटार सायकल रॅलीला नंदुरबार शहरातील नागरिकांनीही तेवढ्याच उत्साहाने प्रतिसाद देत महिला पोलीस अधिकारी व महिलाअमंलदार यांच्या मोटार सायकल रॅलीवर फुलांचा वर्षाव करुन रॅलीचा उत्साह वाढविला . सदर मोटार सायकल रॅलीला सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास प्रांत अधिकारी तथा जिल्हा प्रकल्प अधिकारी मिनल करनवाल यांनी हिरवा झेंडा दाखविला मोटार सायकल रॅली समोर पोलीस बँड पथकाने देशभक्तीपर गीते वाजवून लोकांमध्ये व रॅलीमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण केले .
सदरची रैली ही पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार येथुन निघून नवापुर चौफुली , साक्री नाका , सोनार खुंट हाट दरवाजा , सिंधी कॉलनी , पेट्रोल पंप व तेथुन गांधी पुतळा , नेहरु पुतळा , नगर पालिका , आंधारे चौक , धुळे चौफुली , नवापुर चौफुली व पुन्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या मार्गाने रॅलीने मार्गक्रमण केलेव पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार येथे सदर रॅलीचे समापण झाले . महिला पोलीस अधिकारी व महिला अमलदार यांच्या रॅलीने नंदुरबार वासीयांचे लक्ष वेधून महिला शक्तीचे प्रदर्शन केले . महिला पोलीस अधिकारी व अमलदार यांनी काढलेल्या मोटार सायकल रैलीने महिलांना जणू काही एक प्रकारे सुरक्षेची हमी दिली . सदरची मोटार सायकल रॅली चालू असतांना आजू बाजूला उपस्थित असलेले लोक त्यांच्या मोबाईल मध्ये मोटार सायकल रॅलीचे चित्रीकरण करत होते तसेच टाळ्या वाजवून मोटार सायकल रॅलीचे मनोबल वाढवत होते . पोलीस मुख्यालयात सद्या हेल्मेट सक्ती अनिवार्य केल्यामुळे सर्व पोलीस सद्या हेल्मेट परिधान करीत आहेत . तसेच मोटार सायकल रॅलीतील महिला पोलीस अधिकारी व महिला अमलदार यांनी हेल्मेट परिधान करून आपल्या जीवनात दुचाकी चालवितांना प्रत्येक नागरिकाला हेल्मेटचे महत्व लक्षात आणून दिले तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी हेल्मेट वापरावे असे आवाहन देखील पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी केले .
यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील इतर अधिकारी व नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सुमारे १२५ महिला पोलीस अधिकारी व महिला अमंलदार हे हेल्मेटसह रैलीला उपस्थित होते .