शहादा प्रतिनिधी : शहादा अनु.जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय शाळा मोहिदे त. शहादा या निवासी शाळेत स्री शिक्षणाचे जनक क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे सहाय्यक शिक्षक बी.आर.माळी होते. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘समता दूत – सावित्री ज्योती’ ही लघुनाटिका सादर केली.
शाळेचे शिक्षक रविदास वळवी यांनी महात्मा फुले यांचे स्री शिक्षण व सामाजिक समानता यासाठी केलेले कार्य याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच स्री साक्षमिकरणात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे योगदान भारतीय समाज कधीही विसरणार नाही असेही ते म्हणाले. सामाजिक किंवा चांगले कार्य करताना समाजातील काही घटक जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करायचे प्रयत्न करत असतात परंतु आपण आपले कार्य सतत करत राहिल्यास नक्कीच यश प्राप्त होते. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे कार्य समाजाला सातत्याने प्रेरणादायी राहणार असून विद्यार्थ्यांनी देखील आपल्या आयुष्यात सतत कार्यमग्न राहुन स्वताचा विकास करून घ्यावा असे आवाहन मुख्याध्यापक समाधान केदारे यांनी केले.
शाळेचे विद्यार्थी सुदीप भामरे, अमोल वाल्हे, देवेश शिरसाठ व तेजस भामरे यांनी ‘समता दूत – सावित्री ज्योती’ हे लघुनाट्य श्री .बी.आर.माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांनी महामानवांच्या जीवनावर आधारित काढलेले चित्र सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.बी.ढगे यांनी केले. या प्रसंगी सहाय्यक शिक्षक मनोज भामरे, सर्व विद्यार्थी आणि बाह्यश्रोत कर्मचारी उपस्थित होते.