कर्जत : जयेश जाधव
कर्जत तालुक्यातील नेरळमधील महिलेने बँकेतून काढलेली एक लाख नऊ हजार इतकी रक्कम जुलै 2021 मध्ये चोरट्यांनी लंपास केली होती. या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून त्याच्याकडून हस्तगत केलेल्या रकमेचा धनादेश गुरुवारी (दि. 14) कर्जत रेल्वे पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या स्वाधीन केला. नऊ महिन्यानंतर या गुन्ह्याची उकल होऊन मुद्देमाल फिर्यादीच्या ताब्यात देण्यात आल्याने रेल्वे पोलिसांचे कौतुक होत आहे.
नेरळ टेपआळी भागातील सुनंदा मधुकर कोकाटे (वय 65) या आपल्या नातींसह जुलै 2021 मध्ये युनियन बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी एक लाख नऊ हजाराची रक्कम बँकेतून काढली आणि त्या मिनिट्रेन मार्गाने घरी जात होत्या. मात्र त्यांच्या मागावर असलेल्या आरोपीने त्यांच्या हातातून एक लाख नऊ हजाराची पिशवी खेचली आणि पळ काढला. या प्रकरणी सुनंदा कोकाटे यांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र हा गुन्हा रेल्वे हद्दीत झाला असल्याने नेरळ पोलिसांनी सदर गुन्ह्याची नोंद कल्याण येथे करण्यास सूचना केली. त्यानंतर अॅड. मनोज देशमुख यांच्या माध्यमातून सुनंदा कोकाटे यांनी रेल्वे पोलिसांकडे गुन्हा दाखल केला.
कर्जत रेल्वे पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी यादव यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे तपास सोपवला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल ठोंबरे, पोलीस कर्मचारी पात्रले, ठाकूर, पठाण, तुरडे, शेटे, पेरणेकर यांच्या पथकाने नेरळ रेल्वे वसाहतीमधील सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या सहाय्याने आरोपीला पकडले. त्याच्याकडून हस्तगत केलेली एक लाख नऊ हजाराची रक्कम कल्याण न्यायालयाच्या तिजोरीत जमा केली. न्यायालयाच्या आदेशाने या रकमेचा धनादेश गुरुवारी पोलीस निरीक्षक संभाजी ठाकूर यांनी फिर्यादी सुनंदा मधुकर कोकाटे यांच्याकडे सुपूर्द केला.त्या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल ठोंबरे, कर्जत संघर्ष समितीचे कार्यकर्ते राजाभाऊ कोठारी, मल्हारी माने, कैलाश पोटे, निलेश शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते