वृक्षातून व्यक्त होणारे मातृत्व " परोपकार का मंत्र हमे वृक्ष सदा ही देते है खूब सबको देते छाव हमेशा खुद सहते रहते है धूप " वृक्ष आणि माता यांचे साधर्म्य अत्यंत सुरेख पणे रेखाटलेले या चित्रातून व्यक्त होते. ज्याप्रमाणे वृक्ष हे जीवदान देतात त्याचप्रमाणे माताही जीवदान देते. निसर्ग आणि माता यांच्या अतूट संबंधाचे सौंदर्यात्मक दृष्टिकोनातून भाव टिपलेले या चित्रात दिसून येतात. वृक्षाचा महत्त्वाचा गुण म्हणजे कोणतेही नकारात्मक भावना मनात न ठेवता आलेल्या प्रत्येक व्यक्तीला फक्त परोपकाराच्या भावनेतून सावली देते. त्याचप्रमाणे माता आपल्या लेकरांचे सर्व अवगुण स्वीकारत परोपकार आणि जीवन जगण्याचा मार्ग दाखवते. वृक्षाच्या आणि मातेच्या मूळ स्वभावातच जणू संयम, प्रेम, सद्भावना,सहकार्य, सहजीवन, इतरांसाठी झिजणं दिसून येते. निराधार बालक सुद्धा वृक्षाच्या खाली जाऊन बसतो कारण तो त्या वृक्षात आपल्या आईला अनुभवतो. जेव्हा वृक्षाच्या फांद्या तोडल्या जातात तेव्हा वृक्षाला निशब्द वेदना होतात. त्याचप्रमाणे आईला देखील आपल्या लेकरांच्या चुकीच्या वर्तनाच्या असह्य वेदना होतात. आपणही समाजात जीवन जगताना वृक्षाचा आणि मातेच्या मोठ्या मनाचा आदर्श घेऊन जीवन जगावे हे नैतिक आणि मार्गदर्शक मूल्य या चित्र कृतीतून व्यक्त होते. वृक्षाच्या फांद्या प्रमाणे लवचिकता व नम्रता आणि मातेच्या स्वभावाप्रमाणे प्रेमळ व सकारात्मकता प्रत्येक व्यक्तीच्या ठायी असल्या पाहिजे असा संदेश यातून मिळतो. आपण जगत असलेल्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीने एका वृक्षाची आणि आपल्या मातेची काळजी घेतली तर आपला समाज लवकरच आदर्श आणि मूल्यसंवर्धक होईल. जीवनाचा मोठा सार सांगणारे वृक्ष आणि माता यांच्या अतूट नात्याचे चित्रात्मक रूपातून समर्पकपणे वर्णन चित्रकाराने व्यक्त केलेले आहे.
चित्र सौजन्य- श्री.यशवंत निकवाडे,शिरपूर
चित्र भावार्थ- प्रा. डॉक्टर ज्योती रामोड , पुणे