स्वतःतील शत्रु : अहंपणा " पूर्ण जग जिंकता येते संस्काराने आणि जिंकलेले सर्व हरू शकते अहंकाराने " सुखी व आदर्श जीवन जगण्यासाठी व्यक्तीला स्वतः मध्ये असलेली अहंमभावना आपल्या विचारातून दूर काढता आली पाहिजे. अशी नाविन्यपूर्ण सृजनशीलता कलाकाराने आपल्या चित्रशैलीत उत्कृष्टपणे रेखाटली आहे. जीवन जगताना दुसऱ्याशी संघर्ष करण्यापेक्षा आपल्या नकारात्मक विचारांची आणि अहंकाराशी संघर्ष करा कारण ज्यावेळी तुम्ही अहंकारावर विजय प्राप्त करणार त्यावेळी तुम्हाला जग जिंकण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. मानवाच्या यशस्वी जीवनातील सर्वात कठीण आणि मोठा अडथळा म्हणजे व्यक्तीचा अहंपणा होय. प्रत्येक व्यक्तीच्या ठायी अहंपणा कमी- अधिक प्रमाणात दिसून येतो आणि त्यामुळेच व्यक्तीचे सर्वांगाने नुकसान होते. अहंपणा हा व्यक्तीच्या विचारातूनच स्वभावात प्रतिबिंबित होताना दिसतो. आपल्या विचारातून अहंकाराला दूर करण्याचे मार्मिक व अर्थपूर्ण चित्रण कलाकाराने येथे केलेले आहे. समाजात जीवन जगताना विविध व्यक्तीचा स्वभाव निरीक्षणावरून समाज आणि व्यक्तीच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत तार्किकपणे भाव चित्रातून व्यक्त होतात. कलाकाराने चित्र रेखाटताना नकळतपणे निस्वार्थ भावनेने जगण्याचा संदेश समाजाला दिला आहे. व्यक्तीने वैचारिक अंगाने आणि स्वतंत्र विचाराने स्वतःतील दोष बाजूला ठेवून आनंदी जीवन जगण्याचे गमक अप्रत्यक्षरीत्या कलाकाराने समाजाला या चित्रकृतीच्या माध्यमातून दिलेले दिसून येते. स्वार्थ व अहंकार आणि निस्वार्थ व परोपकार
याची सौंदर्यात्मक गुंफण कलाकाराने आपल्या चित्रकला आविष्कारातून उस्फूर्तपणे मांडलेली आहे. प्रत्येक व्यक्तीने अहंपणा दूर करून जर नम्रता स्वभावात आणली तर तो खरा आदर्श जीवनाचा आणि समाजाचा पाया असेल. " जीवन एकदाच मिळते अहंकारात एकट्याने जगण्यापेक्षा नम्रतेत सर्वांसोबत जगा तेच खरे समाधान आहे "
बाय,
चित्र सौजन्य-यशवंत निकवाडे,शिरपूर
चित्रभावार्थ सौजन्य-.ज्योती रामराव रामोड.
इतिहास विभाग
बाबुरावजी घोलप महाविद्यालय,
सांगवी,पुणे