” सोलुन गेले पाय तरी सुटला नाही तो ध्यास जो समाजाची भूक भागवतो त्यालाच का एवढा त्रास? “
माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे ही आपली भारतीय संस्कृती आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. सर्व जगाचा भार ज्याच्या खांद्यावर आहे तो शेतकरी वर्ग आज खूप संकटात आहे. आपल्या कष्टकरी मालकाची बाजारपेठेतील भाववाढीमुळे, कर्जामुळे, निसर्गाच्या विविध आपत्तीमुळे झालेल्या हतबल परिस्थितीत कायम साथ देणाऱ्या मुक्या प्राण्यांचे आणि मनालाही अश्रूचा बांध फोडणारे भावनिक आणि समाजातील कष्टकऱ्यांच्या वास्तविक स्थितीचे दर्शन कलाकाराने आपल्या चित्रकल्पकतेच्या माध्यमातून साकारले आहे.
माणसासोबतच मुक्या प्राण्यांनाही भावना असतात फरक फक्त एवढाच माणूस आपल्या भावना व्यक्त करू शकतो. मुक्या प्राण्यांच्या भावना मायेच्या स्पर्शाने जाणून घ्याव्या लागतात. त्याच भावनिक ऋणानुबंधाच्या नात्याने हे मुके प्राणी (बैल) आपल्या मालकाला धीर देत आहे. मुक्या प्राण्यातील प्रेमळपणा, प्रामाणिकपणा, एकनिष्ठता, सहकार्य, कष्टाळूपणा आणि भावनिक अनुबंधाचे दर्शन कलाकाराने आपल्या चित्रकृतीतुन प्रतिबिंबित केले आहे. शेतकऱ्याच्या समोरील विविध समस्या यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे जे प्रमाण वाढत आहे. ते थांबवण्याच्या दृष्टीकोनातून समाज परिवर्तनात्मक चित्रण आपल्या प्रतिभाशक्तीतून चित्रकाराने रेखाटले आहे. समाजात विविध जाती, पंथ ,धर्म व संप्रदायाचे लोक राहतात. प्रत्येकाने एकमेकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. असा निशब्द संदेश जणू मुके प्राणी आपल्या कृतीतून व्यक्त करत आहे. ज्याप्रमाणे मानवाच्या शारीरिक, मानसिक गरजा आहेत. अगदी त्याचप्रमाणे भावनिक गरजा ही खूप महत्वपूर्ण आहेत. समाजात प्रत्येकाने जो व्यक्ती संघर्षाच्या परिस्थितीतून जात आहे. त्याला जर फक्त भावनिक आधार दिला तर तो पुन्हा नव्याने जीवनाची सुरुवात करू शकतो. माणूस आणि मुके प्राणी यांच्यातील सखोल आणि वेदनात्मक अशा भावनिक नात्यांची गुंफण कलाकाराने आपल्या चित्रशैलीतून समर्पक आणि दिशादर्शक स्वरूपात व्यक्त केली आहे.
” राब राब राबूनही
फासावर अंत आहे
जगाचा पोशिंद्याची
ही खरी खंत आहे “
चित्र सौजन्य-श्री.यशवंत निकवाडे, शिरपूर
चित्र भावार्थ सौजन्य-प्रा. डॉ.ज्योती रामोड, पुणे