” असं कधीच म्हणू नका की
मी करू शकत नाही
तुम्ही आत्मविश्वासाने ठरवलं
तर काहीही करू शकता ”
मानवामध्ये ज्या प्रतिभाशक्तीची खूप गरज असते. त्या सर्व शक्तींचे प्रतिरूप आपल्याला निसर्गातून पाहायला मिळते. मानव व पशुपक्षी यांच्यातील सगळ्यात मोठा फरक म्हणजे व्यक्त होण्याची पद्धती होय. निसर्गाकडे शांत आणि बारकाईने, निरीक्षणात्मक पैलूतून वेध घेत कलाकारांने पक्षातील अबोल भाव चित्रित केलेले आहेत.निसर्गाकडे पाहिल्यास आपल्याला जाणीव होते. ती म्हणजे शांतता, संयम, उमलणे, बहरणे आणि हे सर्व पैलू आपल्या जीवनात किती महत्त्वपूर्ण आहेत याची जाणीव होते.
मानवाला आजच्या धावपळीच्या जीवनात निसर्गाच्या सानिध्याची खुप गरज आहे. ज्या मृगजळाच्या पाठीमागे माणूस धावत आहे. बंगले, घर, गाड्या या गोष्टी तुम्हाला सुख देऊ शकतात पण समाधान नाही. जर समाधान मिळवायचे असेल तर निसर्ग, पशुपक्षी यांच्या अबोल, निशब्द भावना समजून घ्याव्या लागतील असा संदेश चित्रकाराने आपल्या कलाकृतीतून दिलेला आहे.
ज्यावेळेला पक्षी आपले घरटे एक-एक काडी आणून आपल्या पिलांसाठी बनवतात. त्यावेळी त्या मुक्या जीवांना याची जाणीवही नसते. की कोणत्या क्षणाला झाड तोडले जाईल? सुसाट वारा आला तर माझ्या घरट्याचे काय होईल? खूप पाऊस आला तर घरटे राहील की नाही? पण तरीही किती आत्मविश्वासाने एकमेकांना आपलं घरटं न सोडण्याचं वचन हे पक्षी देतात. यातून पक्षाचे आपल्या घरट्याविषयीचे प्रेम, काळजी, जिव्हाळा हे ऊर्जात्मक भावविश्व चित्रकाराने आपल्या चित्रातून प्रतिबिंबित केलेले आहे.
समाजातील प्रत्येक व्यक्तीने या मुक्या पक्षांच्या कृतीतील आणि मनातील भाव स्वतःच्या जीवनात उतरवून घ्यावा. आपला आत्मविश्वास कधीच कमजोर होऊ देऊ नये. पक्षी ज्याप्रमाणे एखाद्या आपत्तीत घरटे गेल्यावर पुन्हा नव्या जोमाने, दमाने कामाला लागतात. त्यांच्यातील तो गुण मानवाने आत्मसात करावा कोणतेही संकट आले तरी पुन्हा नव्या इच्छाशक्तीने, सकारात्मक दृष्टीने, खंबीर व हसतमुखाने उभे राहावे आणि जीवनाला नवी सुरुवात करावी. असा मार्मिक अंतर्मनाला स्पर्श करणारा भाव चित्रातून अभिव्यक्त केलेला आहे.
” पाऊले चालत राहतील
जोपर्यंत श्वास आहे
परिस्थिती माहीत नाही
पण स्वतःवर विश्वास आहे ”
चित्र सौजन्य-श्री.यशवंत निकवाडे,शिरपूर
चित्र भावार्थ सौजन्य-प्रा.डॉ.ज्योती रामोड, पुणे