(प्रतिनिधी रमजान मुलानी) सांगली : सांगलीतील मिरजेमध्ये आयपीएल सट्ट्यामधील पैशाच्या वादातून दोन गटात तुफान राडा झाला आहे. यामध्ये घराची तोडफोड करण्यात आली असून या राड्यात तीन जण जखमी झाले आहेत. सर्वांच लक्ष लागून राहिलेल्या यंदाच्या आयपीएलच्या १५ व्या पर्वाचा (IPL 2022 ) शेवट आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असतानाच आयपीएल सामन्याच्या आधी सांगलीतून IPL मॅचच्या सट्ट्याच्या (IPL Match Betting) पैशांवरुन दोन गटात तुफान राडा झाल्याची बातमी समोर आली आहे.
आयपीएल म्हंटलं की मॅचवर सट्टा लावण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात. अशाच IPL सट्टेबाजीच्या पैश्याच्या वादातून मिरजेत दोन गटात तुफान राडा झाला आहे. या २ गटांमध्ये झालेल्या राड्यात धारदार शस्त्रांनी हल्ला करत, घरावरांवर दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिरज शहरात (Miraj City) आयपीएल सट्ट्यातील पैश्याच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. या राड्या दरम्यान विश्वास धोंडीराम घोडके यांच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली असून घरावर दगड, विटा फेकून घरांच्या काचा फोडण्यात आल्या. तसंच घराजवळ लावलेल्या एक बुलेट दुचाकीवर दगड घालून वाहनाचे नुकसान केले आहे. यावेळी झालेल्या हाणामारीत विश्वास घोडके, लाईक इनामदार आणि जुबेर शरीकमसलात हे तिघेजण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
त्यानंतर मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, या प्रकरणी घोडके आणि इनामदार या दोन्ही गटाकडून मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून बारा जणांच्या विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. तर याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे मिरज शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.