देवेंद्र फडणवीस : विरोधी पक्षात असताना बीडीडी चाळीतील पोलिसांना मोफत घरांची मागणी करणाऱ्या भाजपने या मुद्यावर यु-टर्न घेतला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आज विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना 25 लाखांपेक्षा कमी दरात घरे देणार असल्याची घोषणा केली. मात्र, विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस मोफत घरांची मागणी करत या मुद्यावर आंदोलन करणार असल्याचे म्हटले होते.
बीडीडी चाळीच्या पुनर्विकासात स्थानिक रहिवाशांना मोफत घरे देण्याचे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने ठरवले होते. तर, पोलिसांसाठी 50 लाखात घरे देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता. पोलिसांना मोफत घरे देण्याची मागणी करत मे महिन्यात वडाळा-नायगाव मतदारसंघाचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले होते. पोलीसांना मोफत घरे द्या, अन्यथा खुर्च्या खाली करा, असे आव्हानच त्यांनी ठाकरे सरकारला दिले होते.
या उपोषणाच्या ठिकाणी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील भेट दिली होती. देवेंद्र फडणवीस यांनी आमदार कोळंबकर यांचे उपोषण सोडवले होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, बीडीडी चाळीतील रहिवाशांप्रमाणे पोलिसांना घरे द्यावीत अशी आमची मागणी आहे. सामान्य नागरिकांप्रमाणे पोलिसांनादेखील मोफत घरे दिली पाहिजे अशी आग्रही मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. बांधकाम खर्च प्रति चौरस फूट 2000 रुपये पकडला तरी 10 लाखांहून अधिक खर्च येणार नाही. पोलिसांना मोफत घर मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हटले होते. त्यानंतर महाविकास आघाडीने सरकारने 25 लाख रुपयांत घरे देणार असल्याचे जाहीर केले.