Whatsapp New Update : व्हॉट्सअॅप हे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया अॅप्स पैकी एक आहे. आपण कितीही व्यस्त असलो तरी आपल्या प्रियजनांशी आपण व्हॉट्सअॅपवरुन सतत संपर्कात राहतो. व्हॉट्सअॅप सतत नवनवे फीचर लाँच करत असते, ज्यामुळे वापरकर्त्यांना अधिक सोयी उपलब्ध होतील. फोटो, व्हिडीओ शेअर करण्यासोबतच व्हॉट्सअॅपवर कॉल आणि व्हिडीओ कॉल करणे देखील शक्य आहे. यासह वापरकर्त्यांना आकर्षित करणारे आणखी एक फीचर म्हणजे स्टेटस. व्हॉटसअॅपवर आपण स्टेटसच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकतो. जे फक्त संपर्क क्रमांक असणाऱ्या किंवा ठराविक निवडलेल्या व्यक्ती पाहू शकतात. हे स्टेटस २४ तासांसाठी उपलब्ध असते. आता याच स्टेटसमध्ये एक नवे अपडेट जोडण्यात येणार आहे.
WaBetaInfo या वेबसाईटच्या रिपोर्टनुसार लवकरच व्हॉट्सअॅपमध्ये नवे अपडेट लाँच होणार आहे. या नव्या फीचरमुळे थेट चॅट लिस्टमध्येच स्टेटस पाहता येणार आहे. व्हॉट्सअॅपमध्ये चॅट लिस्टमध्ये जिथे प्रोफाईल फोटो दिसतो तिथे क्लिक करुन त्या व्यक्तीचा स्टेटस पाहता येणार आहे. जेव्हा एखादी व्यक्ती नवा स्टेटस अपलोड करतील तेव्हा चॅट लिस्टमध्येच त्यांच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करुन ते पाहता येणार आहे.
ज्या व्यक्तींना स्टेटस पाहण्यामध्ये स्वारस्य नाही, अशा व्यक्तींसाठी म्युट पर्याय देण्यात आला आहे. त्यांना सेटिंगमध्ये जाऊन म्युट स्टेटस अपडेट हा पर्याय निवडावा लागेल, ज्यामुळे स्टेटसचे चॅट लिस्टमध्ये येणारे नोटिफिकेशन त्यांना त्रास देणार नाहीत. व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी असे नवनवे फीचर नेहमीच लाँच करत असते. काही दिवसांपुर्वी व्हॉट्सअॅपद्वारे एक नवे अॅप लाँच करण्यात आले. ज्यामुळे विंडोजवर व्हॉट्सअॅप सुरू करणे सहज शक्य झाले आहे. याआधी मोबाईल लिंकद्वारे लॅपटॉपवर व्हॉट्सअॅप सुरू करता येत होते, पण त्यासाठी सतत मोबाईल जवळ ठेवावा लागत असे. पण आता मोबाईल नसतानाही लॅपटॉपवर सहजरित्या व्हॉट्सअॅप सुरू करता येणार आहे.