DPT News Network धुळे :- धुळे जिल्ह्यातील वाहन चालकाचा मध्यप्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील शिकारपूर हद्दीत निर्घुण खून करण्यात आला . काल सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. धुळ्यातून आपल्या गाडीने चौघा अनोळखींना खंडवा येथे सोडण्यास गेले असता चौघांनीच त्याचा खून करून रस्त्यात फेकून दिल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. तसेच त्याचे वाहनही पळवून नेले. या घटनेमुळे चितोड रोड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दीपक विष्णु दाभाडे (वय 36 रा. कैलास नगर, चित्तोड रोड, धुळे) असे मयत तरूणाचे नाव आहे. तो त्यांच्याकडील एमएच 18 बीसी 5667 क्रमांकाची कारने प्रवासी वाहतूक करायचा. दि.28 ऑगस्ट रोजी त्याला मित्राच्या माध्यमातून शहरातील स्टेशन रोडवरील सुयोग लॉजपासून वर्दी मिळाली.
दि. 27 रोजी या सुयोग लॉजमध्ये चार जण उतरले होते. तर दि. 28 रोजी त्यांनी आमची गाडी खंडव्याला खराब झाली आहे. त्यामुळे आम्हाला तेथे जाण्यासाठी फोर व्हिलर पाहिजे. कुणाची गाडी असेल तर सांगा, असे सांगून ही गाडी मिळविली. वर्दी मिळाल्यानंतर दीपक हा सायंकाळी सात वाजता त्यांची कार घेवून सुयोग लॉज येथे आला. तेथून चौघांना वाहनात बसवून खंडवा, मध्यप्रदेशकडे प्रयाण केले.
वाहनात बसलेले चौघे अनोळखी होते. त्यामुळे दीपक याने आपल्या पत्नीशी मोबाईलवरुन सतत संपर्क ठेवला. तसेच एका पेट्रोल पंपावर डिझेल भरतांना त्या चौघांसोबत फोटोही काढून घेतला. तोही पत्नीला पाठविला. तसेच एकाच्या पॅनकार्डचा फोटोही पाठविला. त्यावर जगतार सिंग असे नाव होते.
रात्री एक वाजेपर्यंत दीपक हे पत्नी सौ.वनिता दाभाडे यांच्याशी अधून-मधून मोबाईलवरुन बोलत होते. त्यानंतर पत्नीने सकाळी 6 वाजता दीपक यांना फोन केला असता तो लागला नाही. बराच वेळ होवूनही घरी न परतल्याने त्यांची पत्नी सौ.वनिता दाभाडे (वय 32) यांनी काल सायंकाळी धुळे शहर पोलिस ठाण्यात मिसींगची खबर दिली.
शहर पोलिसात मिसींगची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा दीपक दाभाडे यांचा मृतदेह बुर्हाणपूर जवळील शिकारपूर (जि.सिहोर,मध्यप्रदेश) येथे झाडा-झुडपात फेकलेल्या स्थितीत आढळून आल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी कारही नसल्याने ती या चौघांनी पळवून नेल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे या कारमधील चौघांनीच त्यांचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दीपक यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ-वहिनी, पत्नी, 13 वर्षाचा मुलगा यश, असा परिवार आहे.
दरम्यान दीपकची पत्नी वनिता यांनी सकाळी 6 वाजता दीपक यास फोन केला मात्र तो बंद येत होता. त्यामुळे त्यांनी पतीचे मित्र शरद मराठे यांना त्यांचा शोध घेण्यास सांगितले. त्यानुसार मराठे यांनी या चौघा प्रवाशांपैकी एकाच्या मोबाईलवर फोन करुन विचारणा केली. त्यावर त्यांनी दीपक याने आम्हाला पहाटे 4 वाजता बर्हाणपूर येथे महाराष्ट्र बॉर्डरजवळ सोडल्याचे सांगितले. त्यानंतर दीपकचा भाऊ अशोक विष्णू दाभाडे यांनी देखील त्या प्रवाशाला फोन करुन विचारपुस केली. तेव्हा त्यांनी तेच उत्तर दिले.