प्रतिनिधी – मनोहर पाटील
धुळे – येथील जिल्हा कारागृहात गांजा शेतीप्रकरणातील संशयीत आरोपीने गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जामसिंग जसमल पावरा (वय 70 रा.फत्तेपूर शिवार सांज्यापाडा, ता. शिरपूर) असे त्याचे नाव आहे.
शिरपूर (shirpur) तालुका पोलिसांनी (police) त्याच्या सांज्यापाडा फत्तेपूर शिवारातील गांजा शेतीवर नुकतीच कारवाई केली होती. तब्बल 14 लाखांची पाच ते सहा फुटांची गांजाची झाडे जप्त करण्यात आली होती.
तसेच जामसिंग पावरा यास अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याला दि. 30 सप्टेंबर रोजी न्यायालयीन कोठडी देण्यात आली. धुळे जिल्हा कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली होती.
वयोवृद्ध असल्यामुळे त्याला कारागृहातील बेरेक क्र.2 येथे ठेवण्यात आले होते. पहाटे तीनच्या सुमारास त्याची तपासणी करण्यात आली. मात्र त्यानंतर त्याने शौचालयात कपड्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच कारागृह कर्मचाऱ्यांनी वरिष्ठानसह पोलिसांना माहिती दिली. तसेच मयत पावरा यास जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले.
याबाबत माहिती मिळताच न्यायाधीश, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे, धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.