कोल्हापूर : कोल्हापूरातल्या तालमीत एक दुर्देवी घटना घडली आहे. एका 23 वर्षीय पैलवानाचा मृत्यू झाला आहे. काल ही घटना घडल्यापासून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या पैलवानाचा मृत्यू झाला त्याचं नाव मारुती सुरवसे असं आहे. मारुतीचं मुळं गाव पंढरपूर जिल्ह्यात आहे. ज्यावेळी त्याच्या वाखारी या निवासस्थानी निधनाची बातमी समजली त्यावेळी तिथं स्मशान शांतता पसरली होती.
काल अचानक कुस्तीचा सराव संपल्यानंतर मारुतीला त्रास सुरु झाला. डॉक्टरांनी त्याची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं स्पष्ट केलं. मारुतीच्या मृत्यूमुळे कुस्ती क्षेत्रात सुद्धा हळहळ व्यक्त केली जात आहे.
मागच्या वर्षापासून मारुती कोल्हापुरातील तालमीत कुस्तीचा सराव करीत होता. काल रात्री त्याने नेहमीप्रमाणे कुस्तीचा सराव केला. त्यानंतर तो अंधोळीसाठी गेला, त्यावेळी त्याला अस्वस्त वाटू लागले. त्याच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरु असताना मारुतीचा मृत्यू झाला.
मारुतीचे वडिल त्यांच्या गावी वखारीत शेती करतात. मारुतीला कुस्तीमध्ये करिअर करायचं असल्याने वडिलांनी त्याला कोल्हापूरमध्ये ठेवलं होतं. कोल्हापूरात राज्यभरातून करिअर करण्यासाठी अनेक पैलवान येत असतात. विशेष म्हणजे कोल्हापूरच्या तालमीत आत्तापर्यंत अनेक मोठे पैलवान घडले आहेत.