DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी:- युवराज पाटील
धुळे: धुळे-नागपूर महामार्गावरील तालुक्यातील अजंग शिवारात उभ्या ट्रकचे इलेक्ट्रानीक लॉक तोडून चोरट्यांनी निम्मे ट्रक खाली करीत त्यातील ४९ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना दि.१ डिसेंबर रोजी घडली.
याप्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तपासाची चक्रे फिरवत पारोळ्याहून एका संशयीताला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलिस कोठडी देण्यात आली.
दरम्यान, संशयीताची चौकशी केली जात आहे. ब्लु डार्ट कुरीयर कंपनीचा माल घेतलेला कनिफनाथ रोडलाईन्सचा ट्रक (क्र.एमएच१४/जेएल ८२९९) दि.३० नोव्हेंबर रोजी लॅपटॉप, एलईडी टीव्ही अशा इलेक्ट्रॉनिकच्या वस्तु घेवून निघाला होता. दि.१ डिसेंबर रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास हा ट्रक धुळे तालुक्यातील अजंग शिवाराकडे येत होता. त्यादरम्यान या ट्रकचा एक संशयित वाहन पाठलाग करीत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. दरम्यान चालकाने ट्रकमध्ये दोन-तीन प्रवाशांना देखील ट्रकमध्ये बसविलेले होते. त्या दोन जणांनी चालकाशी गप्पा मारतांना आम्ही देखील ट्रक ड्रायव्हिंग केले असून या क्षेत्रात काम केले असल्याचे सांगत विश्वासात संपादन करीत गप्पा मारीत अजंग शिवार गाठले.
पहाटेची वेळ झाल्यामुळे व ट्रकमध्ये महागडी इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू असल्याने चालकाने अजंग शिवारातील पाईप फॅक्टरीजवळ ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा केला. तसेच काही वेळ झोपही घेतली. ही संधी चोरट्यांनी साधली. त्यांनी या ट्रकला लावलेले इलेक्ट्रॉनिक लॉक तोडून ट्रकमधील ४९ लाख १ हजार ९०८ रूपये किंमतीचे ५७ नग, एससीडी, लॅपटॉप व इतर माल लंपास केला.
दरम्यान चालकाला जाग आल्यावर त्याने बघितले असता चोरट्यांनी ट्रक निम्मे खाली केल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने ही बाब ट्रान्सपोर्ट मालकाला कळविली. माहिती मिळताच सकाळी दादाभाऊ आनंदराव जंजाळ (वय ३३ रा.एच.बिल्डींग, ११ वा मजला, प्लॉट नं.१११२ ता.हवेली, जि.पुणे) हे या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी धुळे तालुका पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अनिल महाजन यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
गुन्हा दाखल होताच धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तपासाची चक्रे गतीमान केली. चालकाच्या माहितीवरून त्याने बसविलेल्या प्रवाशांचा शोध सुरू केला. त्यातील अमोल रामराव सरदार (वय ३५ रा.हनुमानखेडे, ता.अचलपुर, जि.अमरावती) याला दि.६ डिसेंबर रोजी रात्री पारोळ्याहून ताब्यात घेण्यात आले.
ट्रकला जीपीएस सिस्टीम लावलेली असल्याने हा ट्रक नेमका कुठे-कुठे थांबला? याची माहिती पोलिस घेत आहेत.