DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी – प्रभु तडवी
नंदुरबार : अक्कलकुवा येथे अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. अक्कलकुवा येथील वरखेडी नदीच्या पुलाजवळ झुडपांमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीत नवजात बाळ बेवारस अवस्थेत आढळुन आले, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे, या नवजात शिशुस परिसरातील नागरिकांनी आणि पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले असून सध्या बाळाची प्रकृती स्थिर आहे.
अक्कलकुवा शहराजवळ असलेल्या वरखेडी नदीकाठी एक नवजात बालक बेवारस स्थितीत आढळून आलं आहे. दि.१३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ०६.३० च्या सुमारास काही स्थानिक नागरिकांना बाभळाच्या झुडपांमध्ये हे नवजात बालक दिसलं, परिसरातील एका महिलेने प्लॅस्टिकच्या पिशवीतून त्या बाळाला बाहेर काढले, त्यानंतर अक्कलकुवा शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ अक्कलकुवा पोलिसांना बोलावून बाळाला त्यांच्या स्वाधीन केले. महिला पोलिसांनी एका कापडमध्ये गुंडाळलेल्या सुमारे आठ महिन्याच्या बाळाला उपचारासाठी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळाची तपासणी करून प्रकृती ठीक असल्याचं सांगितलं. हे बाळ स्त्री जातीच असून सव्वा किलो वजनाच आहे. बाळ सुखरूप असून त्याच्यावर प्राथमिक उपचार अक्कलकुवा रुग्णालयात करण्यात आले पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे. अज्ञात पालकांच्या शोधासाठी सहायक पोलिस निरीक्षक राजेश गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली अंकिता बाविस्कर पुढील तपास करीत आहेत.