DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी:- प्रभु तडवी
अक्कलकुवा : अक्कलकुवा शहरातील जामिया संकुलातील माध्यमिक व उच्च माध्यमिक इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या इयत्ता आठवीतील विद्यार्थ्याच्या वर्गमित्रानेच चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळ जनक घटना घडली असून या परिसरातील ही पहिलीच घटना असल्याने संपूर्ण जामिया परिसर सुन्न झाला असून शहरात या घटनेची एकच चर्चा सुरू आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्कलकुवा शहरातील जामिया संकुलातील माध्यमिक व उच्च माध्यमिक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या व जामिया वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या इयत्ता आठवीतील पंधरा वर्षीय तर्की फैजुल उर रहेमान अब्दुल खालिक याच्या मोबाईल फोनची चोरी केल्याचे कारणास्तव त्याच्याच वर्गमित्राने चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. दि.06 नोव्हेंबर रोजी नियमित शाळा सुटल्यानंतर दुपारी दीड वाजेनंतर ते रात्री नऊ वाजेच्या वाजेच्या सुमारास इंग्लिश माध्यमाच्या जुन्या शाळेच्या इमारतीतील मुलांच्या प्रसाधन गृहात आरोपी अल्पवयीन मुलाने बोलवून वर्गमित्रावर चाकूने मानेवर तसेच पोटावर वार करून ठार केले. याबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात या अल्पवयीन आरोपीवर भादवि कलम 302 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित करीत आहेत, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सकाळी घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश तांबे पोलीस उपाधीक्षक संभाजी सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
पोलीस अधीक्षक पी आर पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश तांबे, पोलीस उपाधीक्षक संभाजी सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार या गुन्ह्यातील आरोपी केवळ तीन तासात तपासाची चक्रे फिरवून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित फौजदार रितेश राऊत ,रमेश पाटील, महाजन पोलीस कर्मचारी कपिल बोरसे ,खुशाल माळी, किशोर वळवी, आदिनाथ गोसावी, कल्पेश कर्णकार, प्रशांत यादव अविनाश रंगारी यांनी आरोपीस ताब्यात घेतला.
सविस्तर वृत्त =१) मयत विद्यार्थ्यावर अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले यावेळी मयत मुलाच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला होता या दृश्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला होता.
2) मयत विद्यार्थी हा जुन्या इंग्रजी शाळेच्या शौचालय/ स्नानगृहात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला. शहरातील जामिया शैक्षणिक संकुलात प्रथमच अशी खळबळ जनक घटना घडल्याने संपूर्ण संकुलामध्ये शोक कळा पसरली असून परिसर सुन्न झाला होता.
३) या संकुलात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणारे हे दोन्ही एकाच वर्गात शिक्षण घेत होते विशेष म्हणजे दोन्ही गुजरात राज्यातील रहिवासी असून मयत हा मदाबाद येथील तर आरोपी हा सोनगड येथील आहे.