DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी: युवराज पाटील
धुळे : ता, २६. खानदेश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य धुळे आयोजित ६वे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन येत्या २१ व २२ जानेवारी २०२३ असे दोन दिवसीय होणार असून, या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक तथा खानदेशनी वानगी या अहिराणी व्दिमासिकाचे संपादक रमेश आप्पा बोरसे यांची निवड झाली तर स्वागताध्यक्षपदी अश्विनीताई कुणालबाबा पाटील यांची साहित्यिकांच्या बैठकीत करण्यात आली आहे.
ज्येष्ठ साहित्यिक रमेश बोरसे हे सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक असून त्यांनी स्तंभ लेखनाच्या माध्यमातून साहित्य लेखनाला सुरुवात केली. कथा, कविता, ललित अशा साहित्य प्रकारातून आपला प्रभाव सोडत त्रेमासिकाची सुरूवात केली. अहिराणी भाषेचा प्रचार प्रसार करण्यासाठी ते सतत धडपडत असतात.त्यांच्या या भाषिक कार्याची पावती म्हणून खानदेशातील सर्व साहित्यिक व भाषा अभ्यासकांद्वारे सर्वानुमते निवड करण्यात आल्याचे खानदेश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष साहित्यिक प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी सांगितले.
साहित्य लेखनासोबतच सामाजिक भान जपत अहिराणीचा प्रचार प्रसार व खानदेशी बोलीभाषांच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविणे, शासन दरबारी भाषा समृद्धीसाठी सतत प्रयत्नशील राहणे, साहित्यिकांचे संघटन करत नवोदितांना मार्गदर्शन करून लेखनासाठी प्रोत्साहित करणे व साहित्य चळवळीला नेहमी प्रवाहित ठेवण्याचे काम संमेलनाध्यक्षांचे असते आणि त्या कामी रमेश आप्पा बोरसे सतत प्रयत्नशील असल्यामुळे त्यांची निवड संमेलनाध्यक्ष पदी सर्वानुमते करण्यात आली आहे.
धुळे शहरातील हिरे भवन येथे दोन दिवसीय होणाऱ्या ह्या साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, स्मरणिका प्रकाशन, पुस्तक प्रकाशन, ग्रंथ प्रदर्शन, चित्र प्रदर्शन, प्रकट मुलाखत, चर्चासत्र, परिसंवाद, निमंत्रिताचे कवी संमेलन, कवीकट्टा, खानदेशी लोकधारा, गजल मुशायरा, कथाकथन आदी कार्यक्रमांचे आयोजन असणार आहे. तरी सर्व अहिराणी भाषा साहित्यिक, रसिक, भाषिक व विविध बोलीभाषांवर प्रेम करणाऱ्या तमाम खानदेश वासियांना संमेलनास उपस्थित रहाण्याचे आवाहन खानदेश साहित्य संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयात संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रमेश आप्पा बोरसे यांची निवड झाली, याप्रसंगी उपस्थित प्राचार्य रत्नाताई पाटील, शाहिर श्रावण वाणी, प्रा.रमेश राठोड, प्रविण पवार, नाजनीन शेख, डॉ. सदाशिव सूर्यवंशी, ॲड. कविता पवार, ॲड. सागर तापकिरे, रविंद्र पानपाटील, प्रा.अशोक शिंदे, आकाश महाले, विश्राम बिरारी, कमलेश शिंदे, रंजन खरोटे, प्रभाकर सूर्यवंशी, शाहिर नानाभाऊ, डॉ. रमेश जैन, डॉ. श्रीकृष्ण बेडसे, के.एन. साळुंखे, अशोक महाले उपस्थित होते.