DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी: नंदकुमार नामदास
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आधीच विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. आता त्यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप करण्यासाठी महिलेचा शोध सुरु आहे, असा मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी केला आहे. ऋता आव्हाड यांनी नुकतेच एक ट्विट केले असून यासंबंधी माझ्याकडे खात्रीलायक माहिती असल्याचं त्यांनी म्हटलंय. ऋता आव्हाड यांच्या या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात रिदा राशीद यांनी विनयभंगाची तक्रार केली होती. त्यानंतर 354 कलमाअंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. आता त्यानंतर 376 अर्थात बलात्काराचा आरोप करण्यासाठी महिला तयार करण्याचा घाट घातला जातोय, असे ट्विट ऋता आव्हाड यांनी केलं आहे.
राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करून याबद्दल ऋता आव्हाड यांनी विचारणा केली आहे.
विनयभंगाचे प्रकरण काय?
नोव्हेंबर 2022 मध्ये ठाणे आणि कळवा या दोन शहरांना जोडणाऱ्या पूलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमानंतर जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या गाडीच्या बाजूने गर्दीतून वाट काढत पुढे जात होते. या गर्दीतून जाताना तक्रारदार रिदा राशीद या जितेंद्र आव्हाड यांच्या वाटेत आल्या. आव्हाड यांनी त्यांना पकडून बाजूला लोटल्याचं व्हिडिओत दिसून आलं.
जितेंद्र आव्हाड यांनी चुकीच्या उद्देशाने मला स्पर्श करून बाजूला केल्याचा आरोप रिदा राशिद यांनी केला. त्यानंतर आव्हाड यांच्याविरोधात 354 अर्थात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरावर अत्यंत उद्विग्न प्रतिक्रिया दिली होती.
जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता सामंत-आव्हाड यांनीदेखील यावरून संतप्त प्रतिक्रिया दिली होती. अंगावर धडकणाऱ्या व्यक्तीला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेनमध्ये रोज शेकडोंनी विनयभंग होत असतील, असे ऋता यांनी म्हटले. तर रिदा राशिद यांच्यावरच याआधी गुन्हे दाखल असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
आता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाडांविरोधात कट कारस्थान केलं जातंय, असं सूतोवाच ऋता आव्हाड यांनी केलंय