DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – फुलचंद वानखेडे
वाशीम : लग्न म्हटले की नवरदेव मंडळी व नवरी मंडळी कडील सर्वांसाठी एक आनंदाचा सोहळा असतो. सध्या सर्विकडे लग्नाची धामधूम सुरू आहे. रिसोड शहरातदेखील रविवारी एका संस्थानवर लग्नासाठी वऱ्हाडी जमले, नवरदेव वाजत गाजत मित्र परिवारासह लग्नमंडपी जाण्यासाठी निघाला. नवरीही सजून तयार होती. मात्र, झाले उलटेच, वधूने वराला चकमा देत थेट लग्न मंडपातून आपल्या प्रियकरासह पलायन केले.
रिसोड येथील एका संस्थानात रविवारी लग्न सोहळा होता. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील नवरदेव वऱ्हाडी मंडळीसह रिसोड शहरातील लग्नस्थळी पोहचले. पाहुणे जमले, नवरदेव मित्र मंडळीसह मोठ्या उत्साहात नाचत होते. लग्न घटिका जवळ आली. नवरी नटली मात्र, नवरीच्या मनात काही उलटेच होते. तिने टॉयलेटला जाण्याचा बहाणा करून आपल्या प्रियकरासह लग्न मंडपातून पलायन केले.
बराच वेळ नवरी आढळून न आल्याने पाहुणे मंडळींनी तिची शोधाशोध घेतली. परंतु ती तिच्या प्रिकराला घेऊन पसार झाल्याचे लक्ष्यात आले. यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. अखेर हताश होत नवरदेव आपल्या पाहुण्यांसह आल्या पावली गेला. या घटनेची जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगत आहे. जग बदलत चालले असून प्रेमाचे संदर्भदेखील बदलत चालले असून, युद्धात आणि प्रेमात काय होईल हे सांगणे कठीणच झाले आहे.