स्थानिक नेतृत्व म्हणजे काही दिल्लीच्या हातातील बाहुलं नव्हे तर तो नेता मातीतला हवा याकडे भाजप ने केलेले दुर्लक्ष त्यांना चांगलेच भोवले.
कर्नाटक मध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने अपेक्षित विजय मिळवलेला आहे. त्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे विशेष कौतुक करणे अगत्याचे ठरते. त्याआधी हा विजय अपेक्षित होता असं म्हणण्याचा हेतू कॉंग्रेस पक्षाला मिळालेल्या या विजयाचे श्रेय नाकारणे असा अजिबात होत नाही. मात्र भारतीय जनता पक्षाची प्रचार यंत्रणा अशी भारी आहे की एकतर्फी पराभव देखील जणू अटीतटीचा पराभव वाटावा. त्यांनी आपल्या परीने वातावरण निर्मिती करत हवेचा कल आपल्याकडे असल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला मात्र मतदाराने आपला विवेक शाबूत ठेवत सत्तेची भाकरी फिरवली.
आता जर कॉंग्रेस पक्षाला विचारले की या विजयाचे शिल्पकार कोण? तर कोण नाही? अशी स्वाभाविक प्रतिक्रिया असेल. स्वाभाविक यासाठी की विजयाचे श्रेय घ्यायला अनेक जण पुढे येतात मात्र अपयशाचे खापर आपल्या डोक्यावर फुटणार नाही याची काळजी प्रत्येक धूर्त नेता घेत असतो. कॉंग्रेस च्या या विजयाचे श्रेय ज्या कुणाला दिले जायला हवे त्यात राहुल गांधी अर्थात आले. पक्ष रसातळाला गेला असतांना सुशेगात असल्याचे अपश्रेय जसे त्यांचे तसेच ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून त्यांनी कर्नाटकात यश संपादन करण्यात निश्चित ‘सुस्पष्ट’ अशी भूमिका बजावली आहे. ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान साधलेल्या संवादाचे कर्नाटकात मतांमध्ये परिवर्तन होणे ही लक्षणीय बाब म्हणायला हवी. याव्यतिरिक्त आता कर्नाटक राज्याबाहेर देखील सुपरिचित कॉंग्रेस नेत्याचे नाव म्हणजे ‘डी.के. शिवकुमार’ हे होय. भारतीय जनता पक्षाच्या आव्हानाला तितक्याच ताकदीने तोंड देणारा नेता ही त्यांची ओळख केवळ मतदानात नाही तर आत्मविश्वासात देखील भर घालणारी ठरली. इ.डी. च्या माध्यमातून तुरुंगवारी भोगलेले डी.के.शिवकुमार डगमगले नाही हे कुणी तरी महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेत्यांना सांगायला हवे. अर्थात म्हणून डी.के.शिवकुमार म्हणजे काही ‘बावनकशी सोनं’ असं नाही पण कॉंग्रेस चा लक्षवेधी विजय हा केंद्रबिंदू असल्याने तूर्तास विषयाला फाटे नको इतकेच! याशिवाय कर्नाटकच्या विजयातील महत्त्वाचे असे नाव म्हणजे माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या हे होय. ग्रामीण जनतेशी त्यांचे घट्ट असलेले नाते ही या नेत्याची शिदोरी होय. आता मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत ते असतीलच शिवाय त्यांच्या पेक्षा १४ वर्षांनी लहान असलेले डी.के. शिवकुमार यांच्यातली ही स्पर्धा भावी राजकारणातली ‘कर्नाटकी काशिदा’ ठरेल असा एक होरा आहे आणि इथेच वरिष्ठ नेतृत्वाची कसोटी ठरेल. याशिवाय कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव झाकोळले जात असले तरी निवडणूकपूर्व आणि आता निवडणुकीनंतर देखील त्यांची भूमिका कळीची ठरणार आहे. पाय जमिनीवर असले की कसा अचूक अंदाज बांधता येतो याचे प्रात्यक्षिक मल्लिकार्जुन खरगे यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने दाखवून दिले. या निवडणुकीत प्रादेशिक नेत्यांना जसा त्यांनी मोकळा हात दिला तसेच जेव्हा गरज पडेल तेव्हा खमकी भूमिका देखील घेतली. कॉंग्रेस पक्षाला केवळ या निवडणुकीपुरता विचार करून चालणार नाही. दक्षिणेतील इतर राज्यांच्या निवडणुकीवेळी देखील पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाची कसोटी लागेल. कारण ‘परिपक्व नेता’ असा दुर्मिळ म्हणावा हा त्यांचा लौकिक आहे. शिल्पकारांची यादी तशी न संपणारी असेल पण मध्यम फळीतील दोन जणांची नावे विशेष नमूद केली पाहिजेत. पक्षाच्या प्रचाराची रणनीती ठरविणारे सुनील कानुगोळू आणि ऑनलाइन प्रचाराची धुरा सांभाळणारे नरेश अरोरा यांच्या कामगिरीवर देखील नजर ठेवली पाहिजे.
२०१८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कानुगोळू यांनी भाजपसाठी प्रचाराची आखणी केली होती. त्यांना उमेदवार निवडीमध्येही स्थान देण्यात आले होते. या वेळी त्यांनी हीच जबाबदारी काँग्रेससाठी सांभाळली आणि पुन्हा एकदा यशस्वीपणे पार पाडली.
कानुगोळू यांनी तामिळनाडू मधील प्रमुख राजकीय पक्ष द्रमुक, अण्णाद्रमुक या पक्षांसोबतही काम केले आहे. २०१८ पर्यंत कानुगोळू हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रणनीती चमूचा महत्त्वाचा भाग होते. शिवाय काँग्रेससाठी कानुगोळूनी जे काम ‘ऑफलाइन’ केले तेच काम ‘ऑनलाइन’ करण्याची जबाबदारी नरेश अरोरा यांच्याकडे होती. भाजपइतकाच काँग्रेसचाही तगडा ऑनलाइन प्रचार राहण्याचे श्रेय अरोरा यांना जाते. लोकांचे काँग्रेसकडे सातत्याने लक्ष वेधून घेणे आणि भाजप सरकारमधील त्रुटी डोळ्यासमोर आणणे या दोन अजेंड्यांवर अरोरा यांनी काम केले. ऑनलाइन प्रचारात भारतीय जनता पक्षाने सुरुवातीला आपला दबदबा निर्माण केला असला तरी अन्य पक्षीयांनी देखील आता तोडीस तोड ‘डिजिटल भरारी’ मारली असल्याचे वारंवार प्रत्ययास येते.
अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॉंग्रेस पक्षाने प्रचार करतांना स्थानिक मुद्द्यांना विशेष प्राधान्य दिले त्याच वेळी भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय यश लोकांसमोर ठेवले पण त्याचवेळी प्रादेशिक सरकारने काय केले याचे चांगले सादरीकरण करणे भारतीय जनता पक्षाला जमले नाही. की ‘आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार’ अशी त्यांची गत झाली याचा विचार आत्मचिंतनाच्या वेळी भारतीय जनता पक्षाने जरूर करावा. याव्यतिरिक्त निष्ठावंतांचे डावलले जाणे हा मुद्दा भाजप साठी कळीचा ठरला. कारण भारतीय जनता पक्षातून कॉंग्रेस पक्षात गेलेले ७० टक्के उमेदवारांनी यश मिळवले असल्याचे दिसते. याकडे भविष्यात भाजप कशा पद्धतीने पाहत आणि हा मुद्दा कसा हाताळत याकडे महाराष्ट्रातील भाजप च्या धुरिणांचे देखील लक्ष असेल. भारतीय जनता पक्षाने स्थानिक मुद्द्यांना बगल देत भावनिक मुद्द्यांवर स्वार होण्याचा प्रयत्न केला ही एक चूक तर दुसरी म्हणजे स्थानिक नेतृत्व म्हणजे काही दिल्लीच्या हातातील बाहुलं नव्हे तर तो नेता मातीतला हवा याकडे भाजप ने केलेले दुर्लक्ष त्यांना चांगलेच भोवले आणि मग कॉंग्रेसच्या मातीतील नेत्यांनी भाजपला धोबीपछाड न दिला असता तर नवल!
जनता दल हा स्थानिक पक्ष मात्र एकदम अडगळीत गेल्यासारखा दिसतो कारण जागा भारतीय जनता पक्षाच्या कमी झाल्या असल्या तरी टक्केवारीत जनता दलाची मोठी घसरण झालेली बघायला मिळते. कुमारस्वामींना हा झटका आहे आणि कॉंग्रेस बाबत बोलायचे झाल्यास थेट भारतीय जनता पक्षाशी झुंज देत मिळवलेला हा विजय कॉंग्रेसला नवसंजीवनी देणारा आहे.