DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- विशाल घोक्शे पिंपरी: महाराष्ट्रातील महानगरे जणू काही गुन्हेगारांचे अड्डे बनले आहेत. तरुणाईतील युवकांना साउथ इंडियन सिनेमाप्रमाणे भाईगिरी करण्याचे वेड लागले आहे त्या भाईगिरी च्या नादात सोबत असणारे मित्रच वर्चस्वाच्या लढाईत एकमेकाचा गेम करतात. असाच प्रकार पिंपरी चिंचवड परिसरातील चिखली येथे सोमवारी दुपारच्या सुमारास गोळीबार करून एकाचा खून करण्यात आला होता. या खुनामुळे पिंपरी चिंचवड शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र या खूनाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. जवळच्या मित्रानेच तरुणाचा ‘गेम’ केल्याचा दावा केला जात आहे. याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
पिंपरी चिंचवडमधील चिखली भागातील मंदिराजवळ कृष्णा उर्फ सोन्या हरिभाऊ तापकीर (वय २० वर्ष) याचा भरदुपारी गोळीबार करून खून करण्यात आला होता. त्याच्यावर गोळी चालवणाऱ्या आरोपीचे नाव सौरभ उर्फ सोन्या पानसरे (रा. मोई, खेड) असून त्याचा साथीदार सिद्धार्थ कांबळे असल्याचे समोर आले आहे. अचानक घडलेल्या घटनेने चिखली परिसरात नागरिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती.
दरम्यान खून केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले होते. पोलिसांची पथके त्यांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी डोकेवर काढू लागली आहे. पोलिस प्रशासनाने यावर योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
साधारण गेल्या महिनाभरातली ही खुनाची तिसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी शिरगाव येथील सरपंचाचा भर चौकात खून करण्यात आला होता. त्यानंतर तळेगाव येथे जनसेवा समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांचा देखील दिवसाढवळ्या खून करण्यात आला होता.
गुन्हेगारीने डोके वर काढले असल्याची चर्चा असतानाच आता भरचौकात तरुणावर गोळीबार करून खून करण्यात आला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील वातावरण दहशतमय होऊ लागल्याची चर्चा आता सुरू झाल्या आहेत.